मुंबई : वांद्रे परिसरात वास्तव्यास असलेल्या ४० वर्षीय दिव्यांग महिलेने राहत्या इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून बुधवारी दुपारी उडी मारून आत्महत्या केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये उंच उमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून मागील तीन महिन्यांतील ही नववी घटना आहे. उंच इमारती म्हणजे सहज उपलब्ध, खात्रीशीर आणि वेदनारहित वाटणारा मार्ग असतो, त्यामुळे आत्महत्येसाठी हा मार्ग निवडला जात असल्याचे मत मानसोपचारतज्ञांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये विविध कारणांमुले आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. कौटुंबिक कलह, आजारपण, परीक्षेतील अपयश, प्रेमभंग, ताण – तणाव यासह अगदी क्षुल्लक कारणांमुळे आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. अगदी मोबाइल दिला नाही, आई ओरडली तरी मुले आत्महत्या करीत आहेत. यामध्ये किशोरवयीन मुले आणि तरुणांचे प्रमाण जास्त आहे. आत्महत्यांचे विविध प्रकार आहेत. त्यात गळफास घेऊन, विष प्राशन करून, रेल्वे समोर उडी मारून, विहीर, तलावात उडी मारून आत्महत्या केली जाते. त्यातही गळफास घेऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.
…म्हणून उंच इमारतीवरून आत्महत्या केली जाते
उंच इमारतीवरून आत्महत्या करण्याच्या मानसिकतेबाबत वेगवेगळी कारणे असल्याचे विश्लेषण मानसोपचारतज्ञांनी केले आहे. आत्महत्या ही बहुतेक वेळा तात्काळ होणारी कृती असते. अनेकदा आत्महत्या करणारी व्यक्ती काही मिनिटांपूर्वी पर्याय शोधत असते. त्या क्षणी समोर दिसणारी गच्ची, टेरेस किंवा गॅलरी आदी सोपे मार्ग वाटतात, असे मानसोपचारतज्ञ डॉ. सुरेश पाटील यांनी सांगितले.
मृत्युचा हमखास आणि सोपा पर्याय शोधला जातो. त्यामुळे गळफास घेण्याचे प्रमाण जास्त दिसते. उंच इमारतीवरून उडी मारल्याने हमखास मृत्यू होतो. वाचण्याची शक्यता कमी असते त्यामुळेच मुंबईत ४५, ५७, २० व्या मजल्यांवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना घडत आहेत, डॉ. सुरेश पाटील म्हणाले. आत्महत्येसाठी उंच इमारती म्हणजे सहज उपलब्ध, खात्रीशीर आणि वेदनारहित वाटणारा मार्ग असतो. जेव्हा व्यक्तीवर भावनिक, सामाजिक वा मानसिक ताण असतो आणि तेव्हा असा मार्ग सहज दृष्टीस पडतो, असेही ते म्हणाले.
अनुकरण करण्याच्या पध्दती
कॉपी कॅट अर्थात अनुकरण करण्याची एक पध्दत आहे. एकाने केले म्हणून दुसरा त्याच पध्दतीने कृती करतो. त्यामुळे उंच इमारतीवरून एकाने आत्महत्या केली की त्याचे अनुककर करून इतर मंडळीही तोच मार्ग अवलंबतात, असाही एक निष्कर्ष मानसोपचारतज्ञांनी व्यक्त केला आहे.
उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या मागील तीन महिन्यांतील नऊ घटना
२ जुलै २०२५ – कांदिवली- शिकविणीला जाण्यास सांगितल्याने १४ वर्षीय मुलाने ५७ मजली इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली.
३ जुलै २०२५ – गोरेगाव येथे राहणाऱ्या २२ वर्षीय अनंत द्विवेदी या तरुणाने राहत्या इमारतीच्या ४५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
२५ जून २०२५ – भांडुप येथे ३१ व्या मजल्यावरून उडी मारून १५ वर्षीय मुलीची आत्महत्या.
१९ जून २०२५ – साठ्ये महाविद्यालयातील तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून १९ वर्षीय संध्या पाठक या तरुणीची आत्महत्या. एकतर्फी प्रेमातून उचलले टोकाचे पाऊल.
२७ मे २०२५ – विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे २३ व्या मजल्यावरून उडी मारून हर्षदा तांदोलकर (२५) या तरुणीची आत्महत्या.
२८ मे २०२५ – गोरेगाव येथे ४५ व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केली.
७ मे २०२५ – दहिसर येथे राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून मर्मिन मेनन (७२) या वृध्द महिलेने आत्महत्या केली. आजारपण आणि नैराशेमुळे मेनन यांनी आत्महत्या केल्याची शक्यता.
२ एप्रिल २०२५ – दादरमधील हिंदू कॉलनी येथील टेक्नो हाईटस या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून झाना सेठिया (२०) या तरुणीची आत्महत्या केली.