मुंबई :राज्य मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालामध्ये मुंबई विभागाने ९२.९३ टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकवला आहे. त्यात मुंबई विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये रायगड जिल्ह्याने बाजी मारली असून दक्षिण मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. तसेच राज्याप्रमाणे मुंबई विभागामध्येही मुली या मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत.
मुंबई विभागाच्या निकालात रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील २९ हजार ४९३ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ८४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९४.६६ टक्के इतका निकाल लागला आहे. त्याखालोखाल ठाण्याचा निकाल ९३.७४ टक्के लागला असून, ठाण्यातून ९६ हजार ८९ विद्यार्थ्यांपैकी ८९ हजार ८२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुंबई पश्चिम उपनगरने ९३.१८ टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे. पश्चिम उपनगरातील ६४ हजार ८६६ विद्यार्थ्यांपैकी ६० हजार २९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई पूर्व उपनगरमधील ३७ हजार ३४६ विद्यार्थ्यांपैकी ३४ हजार ३१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने हा जिल्हा ९२.२७ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पालघर जिल्ह्यातील ५० हजार ८७० विद्यार्थ्यांपैकी ४६ हजार ७२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पालघरचा निकाल ९२.१९ टक्के इतका लागला आहे. मुंबई शहराचा सर्वात कमी (९०.६७ टक्के) निकाल लागला आहे. मुंबई शहरातून ३६ हजार ४५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील ३२ हजार ९३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकाल दृष्टीक्षेपात…
बारावीच्या परीक्षेसाठी यंदा मुंबई विभागातून ३ लाख १५ हजार ११८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख १४ हजार १४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९१ हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ९२.९३ टक्के इतके आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये १ लाख ६० हजार ९६९ मुले होती त्यापैकी १ लाख ४७ हजार ४५२ उतीर्ण झाले आहेत. मुलांचे उतीर्णतेचे प्रमाण ९१. ६० टक्के इतके आहे. तर मुली १ लाख ५३ हजार १७५ बसल्या होत्या त्यापैकी १ लाख ४४ हजार ५०३ उतीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.३३ टक्के इतकी आहे.
विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल
मुंबईमधून विज्ञान शाखेचे निकाल सर्वाधिक ९६.३३ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून १ लाख १७ हजार ९३२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १ लाख १३ हजार ४१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९२.५९ टक्के लागला असून, वाणिज्य शाखेतून १ लाख ५३ हजार ३५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १ लाख ४१ हजार ५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी २ हजार ९०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ हजार ६२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.३४ टक्के इतके आहे. त्याखालोखाल कला शाखेतील ४० हजार ७१ विद्यार्थ्यांमधून ३३ हजार ७१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ८४.६३ टक्के निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल आयटीआय शाखेचा ७८.२८ टक्के इतका लागला आहे. आयटीआय शाखेतून ८५७ विद्यार्थांपैकी ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत मुंबईच्या निकालात वाढ राज्य मंडळाने जाहीर केलेल्या नऊ विभागांच्या निकालामध्ये मुंबई तिसऱ्या क्रमांकावर असली तरी मागील तीन वर्षांमध्ये मुंबईच्या निकालामध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०२३ मध्ये मुंबईचा निकाल ८८.१३ टक्के इतका लागला होता. २०२४ मध्ये ९१.९५ टक्के इतका लागला तर यंदा बारावीचा निकाल ९२.९३ टक्के लागला आहे. परिणामी मागील काही वर्षे विभागीय निकालात तळाशी असलेल्या मुंबई विभागाची उल्लेखनीय कामगिरी झाली आहे.