मुंबई : दिवाळी संपल्यानंतर आता झाडांवरील दिव्यांच्या माळा, रोषणाई उतरवण्यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. झाडांवर दिव्यांच्या माळा लावण्यास उच्च न्यायालयाने व हरित लवादानेही मनाई केली असली तरी यंदाही मोठ्या प्रमाणावर दिवाळीत झाडांवर रोषणाई करण्यात आली होती. ही रोषणाई हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने आठवड्याभराची मोहीम हाती घेतली असून विजेच्या माळा जप्त केल्या जात आहेत.

दिवाळीच्या काळात रस्त्यावर, दुकानांच्या समोर रोषणाई करण्यात उत्साही मंडळी पुढे असतात. विविध राजकीय पक्षांच्यावतीनेही रोषणाई केली जाते. अनेकदा व्यापारी आपल्या दुकानांकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोषणाई करतात. त्यात अनेकदा झाडांवर विजेच्या माळा लटकवल्या जातात. कधी झाडांच्या खोडांना विजेच्या माळा गुंडाळलेल्या असतात. सणाच्या काळात किंवा काही विशेष प्रसंगी झाडांवर रोषणाई करण्यास पर्यावरणवाद्यांनी यापूर्वी अनेकदा विरोध केला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात गेल्यावर्षी जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. जी २० परिषदेच्यावेळी परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी झाडांवर लावण्यात आलेल्या रोषणाईमुळे हा मुद्दा उच्च न्यायालयात गेला होता. त्यावेळी पालिका प्रशासनाने आठ दिवसात संपूर्ण मुंबईतील झाडांवरील रोषणाई उतरवली होती. मात्र दिवाळीमध्ये पुन्हा एकदा अशीच रोषणाई विवि ठिकाणी झाडांवर करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर आता मुंबई महापालिकेने झाडांवरील विजेच्या माळा हटवण्याचे काम हाती घेतले आहे.

गेल्या दोन दिवसात पश्चिम उपनगरातील ७७ झांडांवरील विजेच्या माळा हटवण्यात आल्या आहेत. तर पूर्व उपनगरातून ३७ आणि शहर भागातून ४० झाडे विजेच्या माळांच्या कचाट्यांतून मुक्त करण्यात आल्याची माहिती उद्यान उपअधिक्षकांनी दिली. काही ठिकाणी पालिकेचे पथक गेले की लोक स्वतःहून या माळा हटवतात. तर काही ठिकाणी पालिकेचे पथक माळा हटवून त्या जप्त करतात.

दरम्यान, महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५ या कायद्यानुसार झाडांवर विजेच्या माळा लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई महापालिकेला नाही. त्यामुळे केवळ विजेच्या माळा हटवणे एवढेच आमच्या हातात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई, ठाण्यासह अन्य शहरांमध्ये झाडांवर केली जाणारी दिव्यांची सजावट प्रकाश प्रदूषण करणारी असून ती पक्षी आणि झाडांवरील कीटकांसाठी धोकादायक ठरत असल्याच्या कारणास्तव गेल्यावर्षी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेतली. तसेच राज्य सरकारसह मुंबई महानगरपालिकेलाही नोटीस बजावली होती. दिव्यांच्या सजावटीचा झाडांवर आणि त्यावर अधिवास करणारे पक्षी व कीटकांवर परिणाम होत असल्याने त्याबाबत पर्यावरणप्रेमींनी ही याचिका दाखल केली होती.