मुंबई स्वच्छ ठेवण्यास मदत करण्याऐवजी नागरिकांकडून सक्तीने पैसे उकळणाऱ्या क्लीन अप मार्शलमुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलीन होत आहे, असे सांगत क्लीन अप मार्शल योजना रद्द करण्याची मागणी स्थायी समितीत करण्यात आली.
क्लीन अप मार्शल पालिकेचे अधिकारी असल्याचा आव आणत दांडगाई करीत आहेत. स्वच्छता ठेवण्याचे कारण पुढे करत ते नागरिकांना लुबाडत आहेत. त्याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत. या मार्शलमुळे पालिकेची प्रतिमा मलीन होत असून त्यांच्यावर कारवाई करून ही योजनाच रद्द करावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य शीतल म्हात्रे यांनी केली. म्हात्रे यांच्या मागणीला इतर सदस्यांनी पाठिंबा दिला.
दरम्यान, क्लीन अप मार्शलमुळे पालिकेच्या प्रतिमेवर परिणाम होत असून त्याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले.