मुंबई : दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेला आणि पायात सळई घातल्याने पायऱ्या चढण्यास त्रास होत असलेला ७१ वर्षांचा वृद्ध पाच मजले चढून जातो व नऊ वर्षांच्या मुलीला डोळा मारतो हे अविश्वसनीय आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) दाखल गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष सुटका केली.
वृद्ध आरोपीवर शेजारी राहणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपांतर्गत २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तथापि, तो राहत असलेल्या इमारतीत उद्वाहक नाही. परिणामी, पायात सळई असल्याने आरोपीला मजले चढताना खूप त्रास व्हायचा. शिवाय, दोनदा त्याच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली होता. या स्थितीत पायऱ्या चढताना त्याने नातीच्या वयाच्या मुलीला डोळा मारला आणि अश्लील हावभाव केले यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. ही कदाचित वास्तविकतेपेक्षा मुलीबद्दलची चुकीची धारणा असू शकेल, असे निरीक्षण देखील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी आरोपीची त्याच्यावरील आरोपांतून निर्दोष सुटका करताना नोंदवले.
याशिवाय, नऊ महिन्यांच्या कालावधीत इमारतीतील इतर कोणत्याही रहिवाशाने आरोपीला मुलीचा पाठलाग करताना किंवा तिच्याशी गैरवर्तन करताना पाहिले नाही हे संशयास्पद असल्याचेही न्यायालयाने म्हटले. आरोपीने त्याचा हेतू सिद्ध करणारे काही शब्द मुलीला उद्देशून उच्चारले असल्याचा आरोप आहे. तथापि, सरकारी वकिलांकडे त्याचे कोणतेही तपशील नाहीत. इमारतीतील रहिवाशांकडून आरोपीच्या वर्तनाचे पुरावे तपास अधिकाऱ्यांनी मिळवायला हवे होते, असे नमूद करून न्यायालयाने पोलिसांच्या तपासातील त्रुटींवरही बोट ठेवले होते.
आरोपी तिला पाहिल्यानंतर, त्यातही जिन्यात भेटली किंवा ती त्याच्या घरी गेली असता नेहमी डोळा मारत असे आणि अश्लील हावभाव करत असे, असा आरोपही मुलीने केला होता. घटनेच्या दिवशी, ३ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मुलगी दाराबाहेरील फरशी पुसत होती, त्यावेळी आरोपीने तिला डोळा मारला. त्याच्या त्या कृतीने ती रडू लागली आणि घरात जाऊन आईवडिलांना तिने घडला प्रकार सांगितला. तिच्या वडिलांनी आरोपीकडे चौकशी केला असता त्याने आरोप नाकारले. त्यामुळे, मुलीच्या आईने पोलिसांत जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
मुलीच्या आईनेही काहीच पाहिले नाही
आरोपीला मुलीशी गैरवर्तन करताना पाहिल्याचे तिच्या आईनेही सांगितले नसल्याचेही न्यायालयाने निकालात नमूद केले. मुलीने ७ सप्टेंबर २०१८ रोजी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आरोपीवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीने न्यायालयात साक्ष देताना, १६ जानेवारी २०१८ रोजी ती आरोपीच्या नातीच्या वाढदिवसासाठी त्याच्या घरी गेली होती. तिला केक खायला देण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला, असे सांगितले होते. तथापि, तिच्या पोलीस जबाबात ही बाब नमूद नाही याकडे विशेष न्यायालयाने लक्ष वेधले.
पोलिसांच्या दाव्यातील विसंगतींवर बोट
फिर्यादी पक्षांच्या दाव्यांत अनेक विसंगती असल्याचे विशेष न्यायालयाने निकालात म्हटले. तसेच, आरोपीच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीला पीडित मुलगी वडील आणि मित्रासह गेली होती. परंतु या दोघांनाही साक्षीदार म्हणून फिर्यादी पक्षाने पाचारण केले नाही. शिवाय, तक्रार नऊ महिन्यांनंतर दाखल केली होती. त्यामुळे, प्रकरणातील एकमेव साक्षीदार असलेल्या मुलीच्या पुराव्यावर अवलंबून राहणे पुरेसे नाही. त्याचप्रमाणे, आरोपीची शारीरिक स्थिती पाहता पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे त्याला दोषी ठरवता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका करताना नमूद केले.