मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत नेहमीच वाढ होत असली, तरी वर्षभर या आजारांचे रुग्ण सापडत असतात. गेल्या सहा महिन्यांत राज्यात आढळलेल्या हिवताप व डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. या काळात शहरात हिवतापाचे १ हजार ९४६ तर डेंग्यूचे ३८९ रुग्ण सापडल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

हिवताप व डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी विविध उपाययोजना राबविल्या जातात. असे असताना हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हिवतापाचे २०२२ मध्ये १५ हजार ४५१, २०२३ मध्ये १६ हजार १५९ तर यंदा जूनपर्यंत ४ हजार ५२३ रुग्ण सापडले आहेत. यात मुंबईमध्ये सर्वाधिक १ हजार ९४६ रुग्ण आढळले असून त्याखालोखाल गडचिरोलीत १ हजार ६५३, चंद्रपूरमधून २१६ आणि पनवेलमधून १५१ रुग्ण सापडले आहेत. गडचिरोलीमध्ये हिवतापाने तिघांचा मृत्यूही झाला आहे.

हेही वाचा…‘लाडकी बहीण’बरोबरच भावांसाठीही योजना जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

तर २०२२ मध्ये राज्यात डेंग्यूचे ८ हजार ५७८, २०२३ मध्ये १९ हजार ३४ रुग्ण आढळले होते. यावर्षी आतापर्यंत २ हजार ८०२ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यातही मुंबईतच सर्वाधिक ३८९ रुग्ण आहेत. त्याखालोखाल पालघरमध्ये २२०, नाशिकमध्ये १९८, कोल्हापूरमध्ये १९२, रत्नागिरीत ११७ आणि नांदेडमध्ये १०१ रुग्ण सापडले आहेत. वर्धा जिल्ह्यात डेंग्यूने एकाचा बळी घेतला आहे.

हेही वाचा…पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर; मेट्रो रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनजागृतीवर भर

राज्यात हिवताप व डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांच्या माध्यमातून आजारांबाबत माहिती पोहोचवली जाते. प्रभात फेऱ्या, कार्यशाळा, प्रशिक्षण, भित्तीपत्रे, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून जनजागृती करत असल्याचे आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक कैलास बाविस्कर यांनी सांगितले.