मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट रेल्वे स्थानकावरील एका आइ्रसक्रीमच्या दुकानाला गुरुवारी सकाळी आग लागली. परंतु, आगीचा भडका पाहून न घाबरता लोकल व्यवस्थापक एम.एस.जोशी यांनी त्वरीत अग्निशमन यंत्रणेचा वापर करून तीन मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

चर्चगेटला आग नेमकी लागली कशी

चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका आइसक्रीमच्या दुकानात शॉर्ट सर्किट झाल्याने गुरुवारी सकाळी ८.१० वाजता आग लागण्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या जोशी यांनी विजेच्या ठिणग्या लक्षात घेतल्या आणि त्यांनी कोणताही संकोच न करता आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी अग्निशामक यंत्र शोधून, आग पसरण्यापूर्वीच ती यशस्वीरित्या विझवली. त्यांच्या तत्पर कृतीमुळे आग आटोक्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला.

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याचे म्हणणे काय

चर्चगेट रेल्वे स्थानक हे वर्दळीचे स्थानक असून लाखो प्रवाशांचा प्रवास या स्थानकातून होतो. गुरुवारी सकाळी ८.१० वाजता एक्झाॅस्ट फॅन जास्त गरम झाल्यामुळे त्यातून धूर निघाला आणि गर्दीच्या वेळी आगीची घटना घडली. परंतु, जोशी यांच्या धाडसी कृतीमुळे आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यात यश आले. केवळ तीन मिनिटांत परिस्थिती हाताळण्यात आली. त्यांच्या कृतीमुळे मोठा संभाव्य अपघात टळला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन त्यांच्या धाडसी आणि सतर्कतेच्या कृतीचे कौतुक करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चर्चगेट स्थानकात याआधीही आगीची घटना

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनी गजबजलेल्या चर्चगेट स्थानकातील कॉन्कोर्स परिसरात केकच्या दुकानाला आग लागण्याची घटना घडली होती. साधारण महिन्याभरापूर्वी, म्हणजेच ५ जून रोजी ती घटना घडली होती. सायंकाळी गर्दीची वेळ असल्याने परतीचा प्रवास करण्यासाठी शेकडो प्रवासी चर्चगेट स्थानकात दाखल होत होते. आगीच्या घटनेमुळे प्रवाशांची धावपळ झाली होती. या घटनेमुळे चर्चगेट परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. तसेच काही काळ लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहचून त्यांनी आग आटोक्यात आणली. स्थानकातील इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक माहिती देण्यात आली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. परंतु, या घटनेचा अंतिम अहवाल अद्याप आला नसल्याने, आगीचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या समितीमधील सदस्यांचे अहवालाबाबत एकमत न झाल्याने, आगी लागण्याचे कारण उघड झाले नाही.