मुंबई : अमेरिकेतील अलाबामा प्रांतात बर्मिंगहॅम येथे झालेल्या जागतिक पोलीस व अग्निशमन क्रीडा स्पर्धेत महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने पहिल्याच दिवशी पहिले पदक जिंकून इतिहास रचला. मुंबई अग्निशमन दलातील सहा जणांचे पथक भारतीय संघात सहभागी होते. यात अग्निशामक गोविंद बिजले, महिला अग्निशामक एकता गोलकर, सिद्धी सोनवणे, श्वेता दवणे आणि उन्नती चिलकेवार यांचा समावेश होता. या पथकाचे नेतृत्व उप प्रमुख अग्निशमन अधिकारी डॉ. दीपक घोष यांनी केले.

बर्मिंगहॅम येथे २८ जून ते ६ जुलैदरम्यान ही स्पर्धा पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ७० हून अधिक देशांतील ५ हजारांपेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते. तसेच ६० पेक्षा अधिक प्रकारच्या खेळ व ड्रिल स्पर्धांमध्ये स्पर्धकांनी कौशल्य दाखवले. भारतातून ४७ अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात मुंबई अग्निशमन दलाचेही जवान सहभागी होते. या सर्व स्पर्धकांचे महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, उप आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या स्पर्धेत भारताने एकूण ५८८ पदके जिंकून तृतीय क्रमांक पटकावला. त्यामध्ये २८० सुवर्ण, १७८ रौप्य आणि १३० कांस्य पदकांचा समावेश आहे. मुंबई अग्निशमन दलातील डॉ. दीपक घोष यांनी अल्टिमेट फायर फायटर गटात (वय ५५ वैयक्तिक गट) कांस्य पदक पटकावले. उन्नती चिलकेवार यांनी स्टेअर रेस कॅजुअल वेअर गटात रौप्य पदक पटकावले. श्वेता दवणे यांनी स्टेअर रेस फुल गिअर गटात रौप्य पदक पटकावले. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय अग्निशमन क्रीडा स्पर्धेतही मुंबई अग्निशमन दलाने १६ सुवर्ण पदकांसह एकूण ४० पदके जिंकून चमकदार कामगिरी केली होती.