Mumbai Lalbaugcha Raja Ganesh Visarjan Latest Updates: राज्यासह मुंबईत गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मात्र मुंबईतील प्रसिद्ध लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाची गणेश मूर्ती गेल्या चार तासांपासून गिरगाव चौपाटीवरच आहे. यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर गणेशमूर्ती चढविताना अडचण होत आहे.
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला २४ तास उलटले आहेत. मात्र रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन झालेले नाही. तत्पूर्वी काही तासांपूर्वीच लालबागच्या राजाच्या मूर्तीवरील दागिने काढण्यात आले आहेत. मात्र अत्याधुनिक मोटराईझ तराफ्यावर गणेशमूर्ती चढविता येत नसल्यामुळे गेल्या चार तासांपासून लालबागच्या राजाच्या गणेशमूर्तीचा अर्धा भाग समुद्रातच आहे. त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व गिरगाव चौपाटीवर जमलेला अलोट जनसागर विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, लालबागचा राजा रविवारी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतरच समुद्राला भरती आली. तेव्हा अत्याधुनिक तराफा हलू लागला. त्यामुळे त्यावर मूर्ती ठेवणे धोकादायक होते. त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने थोडे थांबण्याचा निर्णय घेतला आणि गणेशमूर्ती समुद्रात थोड्या आतमध्ये नेऊन सगळे दागिने काढले. मात्र समुद्राला भरती मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ज्या ट्रॉलीवरून लालबागचा राजा आणला, त्यावरून तराफ्यावर चढविताना अडचण निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांसह स्थानिक कोळी बांधवांकडून प्रयत्न सुरू आहेत. आता भरती कमी झाल्यावर गणेशमूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढविण्यात येणार आहे.