मुंबई : यंदा सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. मात्र, सहा फुटांखालील गणेशमूर्ती केवळ कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक असल्यामुळे महापालिकेने आवश्यक यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली आहे. तसेच, विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती २४ तासात पाण्यातून बाहेर काढून शिळफाटा येथे पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहेत. विसर्जनानंतर पुनर्प्राप्त केलेल्या मूर्तीं पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यासाठी (वाहतूक) लवकरच निविदा मागवून संस्थेची नेमणूक केली जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात दिलेले आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. विसर्जनानंतर गणेशमूर्तींवर प्रक्रिया करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली असून या कार्यपद्धतीनुसार मूर्ती विसर्जनानंतर त्यांची पुनर्प्राप्ती आणि पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेही पालिकेला विविध मार्गदर्शक तत्वे ठरवून दिली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मूर्ती विसर्जनाच्या बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती विसर्जित झाल्यानंतर त्यांची पुनर्प्राप्ती करणे, पुनर्प्रक्रिया करणे, त्याच्या शास्रोक्त पद्धती कोणकोणत्या असू शकतात हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याच्या सूचना महापालिकेला करण्यात आल्या असून त्याबाबतची कार्यवाही विचाराधीन आहे. संबंधित तज्ज्ञ समिती नेमल्यानांतर त्यांच्याकडून विसर्जनाबाबत विविध शिफारसी केल्या जाणार आहेत. त्यांनतर त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी काही अवधी जाईल. तोपर्यंत न्यायालयाचे आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन योग्य रीतीने व्हावे, यासाठी महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धती ठरवून दिली आहे.
विसर्जनानंतर पुनर्प्राप्त केलेल्या सर्व मूर्तीं पुनर्प्रक्रियेसाठी शिळफाटा येथील डायघर येथे पाठविण्यात येणार आहेत. या ठिकाणापर्यंत वाहतूक करण्यासाठी पालिकेने दर निश्चित केले आहेत. प्रत्येकी १२ तासांचे सत्र आणि संबंधित ठिकाणापर्यंतचे अंतर या बाबी लक्षात घेता, १०० किलोमीटर अंतरासाठी ९ हजार ६२८ रुपये (शहर विभाग), ८० किलोमीटर अंतरासाठी ८ हजार ७८८ रुपये (पूर्व उपनगरे) आणि १०० किलोमीटर अंतरासाठी ९ हजार ६२८ रुपये (पश्चिम उपनगरे) असे दर निश्चित करण्यात आले आहेत. या दरांमध्ये वाहन चालक खर्च, इंधन, परिरक्षण खर्च, पथकर (टोल), वाहनतळ, विमा आणि इतर सर्व अनुषंगिक खर्च समाविष्ट करून ते दर निश्चित करण्यात आले आहेत. पुनर्प्राप्त केलेल्या मूर्तींची वाहतूक करताना, वाहनामध्ये मूर्ती ठेवणे आणि उतरवणे ही कामे योग्य रितीने व्हावीत, यासाठी किमान तीन कामगार नेमणे आवश्यक राहणार आहे. या मनुष्यबळाचा खर्चही त्यात गृहीत धरण्यात आला आहे. यासाठी प्रशासकीय विभाग स्तरावर निविदा मागवून संस्थेची नेमणूक केली जाणार आहे.
प्रमाणित कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये
१) कृत्रिम तलाव, तात्पुरत्या टाक्यांमध्ये विसर्जित झालेल्या सर्व मूर्ती २४ तासांच्या आत गरजेनुसार यंत्राच्या अथवा मनुष्यबळाच्या सहाय्याने बाहेर काढाव्यात.
२) आवश्यक शक्य तेथे लहान आकाराच्या मूर्ती मनुष्यबळाच्या सहाय्याने पुनर्प्राप्त करता येतील. त्यासाठी संबंधित मनुष्यबळाला हात मोजे (ग्लोव्हज), जलसंरक्षक बूट इत्यादी संरक्षक साधने पुरवावीत.
३) मोठ्या आकाराच्या मूर्ती सुव्यवस्थितपणे, सुरक्षितपणे पुनर्प्राप्त करता याव्यात, यासाठी क्रेन सारख्या योग्य संयंत्रांचा उपयोग करावा.
४) पुनर्प्राप्त केलेल्या सर्व मूर्तींची पडताळणी करण्यासाठी दस्तावेज तयार करण्यात यावा.