मुंबई – पश्चिम उपनगरातील गोराई येथील रहिवाशांच्या घरांना मुंबई महापालिका प्रशासनाने दिलेल्या नोटीशीच्या विरोधात तेथील रहिवाशांनी गुरुवारी महापालिकेच्या आर उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा नेला होता. मात्र ही कारवाई बनावट नकाशाचा आधार घेऊन अनधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामांच्या विरोधात असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. रहिवाशांकडे काही कागदपत्रे असतील तर ती त्यांनी सादर करावित असे आवाहन प्रशासनाने केल्यानंतर आंदोलनकर्ते परतले.
बनावट नकाशाचा आधार घेऊन अनधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामांच्याविरोधात मुंबई महापालिका प्रशासनाने मोठी कारवाई हाती घेतली आहे. त्यात मढ, मनोरी येथील बंगल्यांना नोटीसा देऊन कारवाई केली जात आहे. त्यातच आता गोराई येथील बंगल्यांना, अनधिकृत बांधकामांना, व्यावसायिक बांधकामांना नोटीसा दिल्या आहेत. त्यांच्या विरोधात गुरुवारी गोराई, कुलवेम, मनोरी येथील रहिवाशांनी आंदोलन पुकारले होते. भाजपचे आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि भाजपचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
आमच्या जमिनी, आमचे व्यवसाय, आमची घरे यांना संरक्षण द्या, भूमीपुत्रांना विस्थापित करू नका अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या. आम्ही १९६० सालापासून इथे राहतो. आमच्यावर कारवाई करू नका अशा मागण्या यावेळी रहिवाशांनी केल्या.
बनावट नकाशानुसार गोराई येथील सागरी किनाऱया लगत बांधकामे झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ज्या सीटीएस क्रमांकाबाबतच्या तक्रारी आल्या आहेत त्यांनाच आम्ही नोटीसा दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली. पालिकेने केलेली कारवाई नियमानुसारच असून ती करावीच लागणार असल्याचे नांदेडकर यांनी सांगितले. निवासी बांधकामे पावसाळ्यात तोडली जाणार नाहीत. त्या कालावधीत त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावे असेही रहिवाशांना सांगण्यात आले. मात्र व्यावसायिक बांधकामे, हॉटेल, बंगले मात्र आम्ही तोडणार आहोत असेही नांदेडकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, बनावट नकाशाचा आधार घेऊन मागील वर्षभरात मढ भागात १३० अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचे आढळून आले होते. त्यातील सुमारे ४४ बांधकामांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यात अनधिकृत बंगले, रिसॉर्ट अशी व्यावसायिक स्वरुपाची बांधकामेही करण्यात आली होती. सुमारे सात हजार चौर फुटांपर्यंतची बांधकामेही करण्यात आली आहेत. तशीच बांधकामे गोराई येथेही करण्यात आली असून त्याचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचे आढळले आहे.