मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत राज्यातील एकूण २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले, तर हजारो विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या गुणवंतांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना वरळीतील ‘द हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड’ या वसतिगृहात्मक अंध शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. या शाळेतील सर्वच्या सर्व ८ विद्यार्थी प्रथम, तसेच विशेष श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

यंदा राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ९ हजार ६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थांनी परीक्षा दिली आणि ८ हजार ८४४ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ९२.२७ टक्के आहे.

विविध अडचणींवर मत करीत जिद्दीच्या जोरावर दिव्यांग विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अनेकांसाठी आशेचा किरण ठरले आहे. तर वरळीतील ‘द हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड’ या वसतिगृहात्मक अंध शाळेतील विद्यार्थ्यांचे यशही अनेकांसाठी ‘प्रेरणादायी दृष्टी’ ठरले आहे. या शाळेतील ४ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीत आणि ४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत शाळेच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला आहे. यापैकी एका विद्यार्थ्याने ८४ टक्के गुण प्राप्त करीत शाळेतून पहिल्या येण्याचा मान पटकावला आहे. ‘द हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड’ या वसतिगृहात्मक अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःची जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या खंबीर पाठिंब्याच्या जोरावर या यशाला गवसणी घातली आहे.