मुंबई : मलबार हिल परिसरातील नेपियन सी रोड येथे सोमवारी सकाळी संरक्षक भिंत कोसळून मोठा अपघात झाला. संरक्षक भिंत अंगावर पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
मलबार हिल येथे नेपियन सी रोड परिसरात शिमला हाऊस येथे संरक्षक भिंत कोसळली. सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. हैदराबाद इस्टेट आणि गोदरेज बाग या दोन इमारतीच्या मधील संरक्षक भिंत एका झाडावर कोसळली. भिंत आणि झाड दोन्ही जमिनीवर आदळले. गोदरेज बाग इमारतीच्या परिसरात ही भिंत पडली. या दुर्घटनेत सतीश तिर्के (५० ते ५५) हे जखमी झाले. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉ. नाहिदा यांनी त्यांना मृत घोषित केले. तिर्के हे सुरक्षा रक्षक होते अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली.
घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका तसेच पालिकेचे कर्मचारी तातडीने दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने झाड हटवले.