मुंबई : मनाचे श्लोक या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला उच्च न्यायालयाने गुरूवारी हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे, चित्रपटाच्या शुक्रवारच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय देताना, जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे या समर्थ रामदास स्वामींच्या ‘मनाचे श्लोका’तील पंक्तींचा न्यायालयाने प्रामुख्याने संदर्भ दिला.

या चित्रपटाच्या शीर्षकाचे समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य असले तरी त्याचा मूळ मनाच्या श्लोकांशी काहीही संबंध नाही, असे निरीक्षणही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने उपरोक्त निर्णय देताना नोंदवले. त्याचवेळी, चित्रपटाच्या सुरुवातीला समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोकांशी चित्रपटाच्या शीर्षकाचा कोणताही संबंध नसल्याची सूचना प्रसिद्ध करण्याचे आदेशही न्यायालयाने निर्मात्यांना दिले.

या चित्रपटाची झलक पाहून किंवा चित्रपटाच्या शीर्षकामुळे हिंदू धर्म व संस्कृतीशी संबंधित व्यक्तींच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, चित्रपटाच्या शीर्षकासाठी मनाचे श्लोक या शब्दांचा वापर करणे समर्थ रामदास स्वामी यांच्या अनेक अनुयायांचा अनादर करण्यासारखे आहे. त्यामुळे, चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आणि प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती.

मनाचे श्लोक पवित्र ग्रंथासारखे आहेत. तसेच, भारतासह जगभरातील कोट्यवधी हिंदू त्याचे अनुकरण करतात. याउलट, चित्रपटाचा आशय हा लिव्ह इन नाते आणि व्यभिचाराशी संबंधित आहे. त्यामुळे, चित्रपटासाठी मनाचे श्लोक शीर्षक वापरू दिल्यास ते समर्थ रामदास स्वामी यांच्या शिकवणीचे चुकीचे चित्रण केल्यासारखे होईल, असा दावाही याचिकेत करण्यात आला होता.