मुंबई : व्याख्यानानिमित्त परदेश प्रवासाला परवानगी देण्याची मागणी मान्य करण्यास आम्ही इच्छुक नाही, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केल्यावर शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी याचिका मागे घेतली.

तेलतुंबडे यांना परदेशात जाण्यास परवानगी मिळाल्यास ते फरारी होऊ शकतात, अशी भीती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केली होती. विशेष न्यायालयाने तेलतुंबडे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर ही भीती निर्माण झाल्याचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजित भोसले यांच्या खंडपीठाने तेलतुंबडे यांच्या वकिलांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, प्रत्यक्ष जाण्याऐवजी दूरसंवाद प्रणालीद्वारे व्याख्यान देण्याचा विचार करा, अन्यथा जाऊ नका, असेही न्यायालयाने मागणी मान्य करण्यास तयार नसल्याचे नमूद करताना स्पष्ट केले.

ॲमस्टरडॅम विद्यापीठाने चार आठवड्यांच्या कार्यक्रमासाठी तेलतुंबडे यांची निवड केली आहे. त्यावेळी पीएच.डी. उमेदवारांसोबत चर्चासत्रांनाही ते उपस्थित राहतील, व्याख्याने देतील. त्यामुळे, परदेश दौऱ्यासाठी परवानगी देण्याच्या मागणीसाठी तेलतुंबडे यांनी याचिका केली होती.