मुंबई : दिवाळीत मुंबईतील घरांच्या विक्रीत वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र ऑक्टोबरमध्ये घर विक्रीत अपेक्षित वाढ झालेली नाही. सप्टेंबरमध्ये १२ हजार घरांची विक्री झाली होती, तर ऑक्टोबरमध्ये ११ हजार ५०० घरांची विक्री झाली. या घर विक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्कापोटी १०१५ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.घर खरेदीसाठी साडे तीनमुहूर्त महत्त्वाचा मानला जातो. या साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे दिवाळीतील पाडवा. दिवाळीतील पाडव्याचा मुहूर्त साधून मुद्रांक शुल्क भरून घराचा ताबा घेण्याकडे आणि घर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल असतो. त्यामुळे दिवाळीत घरांच्या विक्रीत मोठी वाढ होईल, अशी आशा बांधकाम व्यवसायाला होती. त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या १८ दिवसांत ८ हजार घरांची विक्री झाली होती.
घर विक्रीचे हे प्रमाम समाधानकारक मानले जात होते, तर ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत घरांच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात ऑक्टोबरमध्ये १२ हजार घरांचीही विक्री होऊ शकली नाही. सप्टेंबरमध्ये मुंबईत १२ हजार ७० घरे विकली गेली होती आणि यातून राज्य सरकारला १२९२ कोटी रुपये महसूल मिळाला होता. ऑक्टोबरमध्ये घरांच्या विक्रीत आणि महसुलात घट झाल्याचे चित्र आहे. ऑक्टोबरमध्ये ११ हजार ५०० घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला यातून १०१५ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
ऑक्टोबरमध्ये एक कोटी रुपयांहून कमी किंमतीची ४८ टक्के, १ ते २ कोटी रुपये किंमतीदरम्यानची ३१ टक्के, २ ते ५ कोटी रुपये किंमतीदरम्यानची १६ टक्के आणि ५ कोटींहून अधिक किंमतीची ६ टक्के घरे विकली गेली. तर ५०० चौरस फुटापर्यंतची ४० टक्के, ५००-१००० चौरस फुटांपर्यंतची ४५ टक्के, १००० ते २००० चौरस फुटांपर्यंतची १३ टक्के, २००० चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळाची ३ टक्के घरे विकली गेली आहेत. त्याचवेळी एकूण घरविक्रीपैकी पश्चिम उपनगरातील घरांचा हिस्सा ५५ टक्के, मध्य उपनगरांचा हिस्सा २९ टक्के, दक्षिण मुंबईचा हिस्सा १० टक्के, तर मध्य मुंबईचा हिस्सा ६ टक्के आहे.
