मुंबई : शीव – पनवेल महामार्गावरील चेंबूर परिसरात एका दुचाकी कंपनीने विक्रीसाठी आणलेल्या शेकडो दुचाकी चक्क पदपथावर उभ्या केल्या आहेत. यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत असून महापालिकेने तत्काळ यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गेल्या सहा वर्षांपासून चेंबूरच्या शीव-पनवेल महामार्गावर मेट्रो २ बचे काम जोरात सुरू आहे. या कामामुळे अनेक वर्षांपासून येथे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा आहे. त्यातच येथील मैत्री पार्क परिसरातील एका खासगी कंपनीच्या दुकानासमोरील पदपथावर शेकडो दुचाकी उभ्या करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या दुचाकी पदपथावरच उभ्या असून पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे एखाद्या पादचाऱ्याचा अपघात झाल्यास त्याला जवाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

रस्त्यालगत उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर तत्काळ वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. मात्र पदपथावर उभ्या असलेल्या या दुचाकींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पदपथावर उभ्या वाहनांवर पालिकेने कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र पालिकेकडून कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.