मुंबई : प्राणी कल्याण संस्था आणि पॉज मुंबई यांच्या संयुक्त पथकाकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर महाराष्ट्र वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. ग्रॅण्ट रोड येथील एका घरावर छापा टाकून एक भारतीय स्टार कासव जप्त केले आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय ईश्वरलाल वाघेला याला वन विभागाने अटक केली आहे. दरम्यान, ही कारवाई वन्यजीव संरक्षण कायदा,१९७२ अंतर्गत करण्यात आली असून, या प्रकारात शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

स्टार कासव ही प्रजाती भारतात संरक्षित असून तिची तस्करी किंवा बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. या प्रकारच्या वन्यजीवांचे बेकायदेशीर व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांचे संरक्षण हे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान, भारतीय स्टार कासव हा वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अमुसूची १ अंतर्गत संरक्षित प्रजाती असल्याने, वाघेलावर कायद्याच्या कलम ९, ३९, ४८, ४९ आणि ५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसांच्या कोठडीचे आदेश दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई येथील परिक्षेत्र वन अधिकारी शिल्पा शिगवन, ठाणे येथील उपवनसंरक्षक (वन्यजीव) अक्षय गजभिये आणि सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) मनोहर दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राकेश पाटील आणि कर्मचाऱ्यांनी हा छापा टाकला. या प्रकरणाचा अधिक तपास लावत असल्याचे शिगवन यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी वन्यजीवांना बेकायदेशीरपणे बंदी बनविणे, पाळणे, तस्करी करणे किंवा शिकार असे आढळल्यास जवळच्या वन कर्मचार्य़ाला किंवा वन्यजीव तस्करी नियंत्रित करण्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना कळवावे. माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल असे देखील त्यांनी सांगितले.

स्टार कासवांची तस्करी होण्यामागचे कारण

  • स्टार कासवांचे विशिष्ट आकर्षक शोल डिझाइन यामुळे त्यांना मागणी मोठ्या प्रमाणात असते.
  • अनेक देशांमध्ये हे कासव एेक्सोटिक पेट म्हणून मोठ्या किंमतीला विकले जाते.
  • या कासवांना घरात ठेवली तर घराची भरभराट होते असा गैरसमज आहे. यामुळे अनेकदा हे कासव घरात पाळले जातात.