मराठी सिनेअभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या घरातून ६ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले असून तिच्या पतीच्या चालकाने एफआयआर दाखल केला आहे. नेहा पेंडसेचा पती शार्दुल सिंग बायस (४७) यांच्याकडे कामावर असलेले चालक रत्नेश झा (४७) यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील अरेटो बिल्डिंगच्या २३व्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमध्ये ही चोरी झाली. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलंआहे.

२८ डिसेंबर रोजी बायस यांनी त्यांना चार वर्षांपूर्वी लग्नात भेट म्हणून मिळालेले सोन्याचे ब्रेसलेट आणि हिऱ्याने घडवलेली अंगठी हरवली आहे. बायस हे दागिने सहसा बाहेर घालायचे आणि घरी परतल्यावर त्यांनी ते घरातील मदतनीस सुमित कुमार सोलंकी याच्याकडे सोपवले. त्याने ते बेडरूमच्या कपाटात ठेवले, असं पोलीस तक्रारीत नमूद आहे.

हेही वाचा >> सोशल मीडियावर पहिली ओळख अन्…; ‘अशी’ आहे प्रथमेश परब-क्षितिजाची अनोखी लव्हस्टोरी

सुमित सोलंकीसह घरातील इतर मदतनीस घरातच राहतात. घटनेच्या दिवशी बायस बाहेर जाण्याच्या तयारीत असताना ते कपाटात दागिने शोधत होते. परंतु, त्यांना दागिने सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी घरातील सर्व लोकांकडे चौकशी केली. परंतु, कोणालाच दागिन्यांविषयी माहिती नव्हती.

दरम्यान, दागिने गहाळ झाल्याचं लक्षात आलं, त्यावेळी सोलंकी घरी नव्हता. त्यामुळे बायस यांनी सोलंकीशी संपर्क साधला. परंतु तेव्हा तो कुलाबा येथे मावशीच्या घरी असल्याचं त्याने सांगितलं. त्याला दागिन्यांविषयी विचारलं असता सोलंकी याने दागिने नेहमी ठेवले जातात तिथेच ठेवले असल्याचं सांगितलं. मात्र, बायस यांनी शोधाशोध केली असता दागिने कुठेच सापडले नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलंकीविरोधात संशय वाढल्याने तक्रार दाखल

सोलंकीबद्दल संशय वाढल्याने, बायस यांनी त्याला त्वरित घरी परतण्याची सूचना केली. परंतु सोलंकीने परतण्यास उशीर केला. त्यामुळे सोलंकीवर संशय बळावत गेला. परिणामी बायसचा ड्रायव्हर झा याने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल करून सोलंकीवर संशय व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी सोलंकी याला अटक केली असली तरी चोरीचे दागिने अद्याप मिळालेले नाहीत.