मुंबई : कबुतरखान्यावरील कारवाईमुळे सध्या मुंबईतील वातावरण ढवळून निघाले आहे. कबुतरखान्यावरील कारवाईबाबत जैन समुदायाच्या दबावामुळे राज्य सरकारने नमते घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे जैन समुदायाने कबुतरांना आपल्या घरात ठेवावे असे सल्ले समाज माध्यमांवरून दिले जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून जैन समुदायानेही मग तुम्ही कावळ्यांना घरात ठेवा असा खोचक प्रतिसल्ला दिला आहे.
दादरचा कबुतरखाना बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईवरून जैन समाज प्रंचड आक्रमक झाला. कबुतरखाना बंद करण्यास जैन समाजाने विरोध दर्शवला. तसेच सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही या निर्णयाला विरोध केला. त्यानंतर राज्य सरकारने नमते घेत कबुतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत महापालिकेने खाद्य पुरवठा नियंत्रित पद्धतीने सुरू ठेवावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे जैन समाजाच्या दबावापुढे राज्य सरकारने नमते घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला.
राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी जैन समुदायाने दादरच्या कबुतरखान्याजवळ हुल्लडबाजी करीत महापालिकेने लावलेली ताडपत्री हटवली. जैन समुदायाच्या या आक्रमतेमुळे कबुतरखाना हटवण्याच्या बाजूने असलेल्या समुदायाने समाज माध्यमांवरून जैनांवर टीका केली आहे. या टीकेवरून आता जैन आणि मराठी, जैन आणि हिंदू असा वाद समाजमाध्यमांवर रंगला आहे.
जैन समाजाला कबुतरे इतकीच प्रिय असतील तर त्यांनी आपल्या घरात कबुतरे पाळावीत असे सल्ले कबुतरांच्या विरोधी गटाकडून दिले जात आहेत. तसेच जैनांनी आपल्या देरासरमध्ये कबुतरांना खाद्य घालावे, तिथे कबुतरखाने सुरू करावे असेही सल्ले दिले जात आहेत. त्याचबरोबर जैनांच्या मंदिराच्या खिडक्यांना, घरांच्या खिडक्यांना कबुतरांसाठी जाळी का असते असेही सवाल केले जात आहेत. या प्रश्नावरून आता आरोग्याचा मुद्दा बाजूलाच राहिला असून धार्मिक वाद सुरू झाला आहे. तसेच जैन समुदायावर अंधश्रद्ध म्हणूनही टिका होऊ लागली आहे.
कबुतरखान्याला विरोध असलेल्यांच्या या टीकेला आता जैन समुदायानेही समाज माध्यमांवरून टीकेने उत्तर दिले आहे. त्यांत त्यांनी हिंदू समाजाला लक्ष्य केले आहे. हिंदू धर्मात पितरांना खूष करण्यासाठी कावळ्यांना अन्न देण्याची प्रथा आहे. मग हिंदूंनी पण कावळ्यांना घरी न्यावे असे प्रत्यत्तर समाज माध्यमावरून दिले जात आहे. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटला आहे.
जर कोणाला आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपायच्या असतील तर त्यांनी पितरांच्या नावाने गोरगरिबांना अन्नदान करा, झाडे लावा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात दान करा. कावळ्यांना अन्न घालणे हा पूर्वजांचा सन्मान नव्हे तर अंधश्रद्धेचा भाग आहे अशी टीका जैन विश्व संघटन या संघटनेचे वकील धनपाल जैन यांनी केली आहे.