बेस्टने मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी देत किमान भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पाच किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे पाच रुपये निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी किमान अंतरासाठी अंतरासाठी आठ रूपये आकारण्यात येत होते. मंगळवारी बेस्टच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा महिन्यांसाठी ६०० कोटी रुपये देण्याचे नुकतेच मान्य केले आहे. तसेच तीन महिन्यांत बदल दिसले पाहिजेत, अशी अट घालताना बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचे आदेश करारात आहेत. हे बदल न झाल्यास अनुदानाचा हप्ता देण्यात येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार बेस्ट बेस्ट उपक्रमाने नवीन भाडेदराचा प्रस्ताव तयार केला होता. नवीन प्रस्तावानुसार प्रौढ आणि लहान मुलांसाठी भाडेदर सारखेच राहतील.
तसेच बेस्टने सामान्य बसेस व्यतिरिक्त एसी बसेसच्या किमान भाड्यातही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एसी बसेसच्या भाडे दरातही कपात करून ते 6 रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी एसी बसेससाठी 15 रूपयांचे किमान भाडे आकारण्यात येत होते. बेस्ट समितीच्या मंजुरीनंतर आता हा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत पाठवण्यात येमार आहे. महापालिकेत मंजुरी मिळाल्यानंतर नवे दर लागू होण्याचा मार्ग मोकळा होईल. दरम्यान, गुरूवारी महापालिकेच्या सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर होईल. दरम्यान, बेस्टच्या ताफ्यात लवकरच 530 नव्या बसेस सामिल होणार आहे. बेस्टच्या प्रवाशांची संख्या वाढवून ती 40 लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट्य ठेवले असल्याची माहिती, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिली.
दरम्यान, सामान्य बससाठी पहिल्या 5 किलोमीटरसाठी 5 रूपये, 10 किलोमीटरसाठी 10 रूपये, 15 किलोमीटरसाठी 15 रूपये आणि 15 पेक्षा अधिक किलोमीटरच्या प्रवासासाठी 20 रूपये आकारण्यात येणार आहे. तर एसी बससाठी पहिल्या 5 किलोमीटरसाठी 6 रूपये, 10 किलोमीटरसाठी 13 रूपये, 15 किलोमीटरसाठी 19 रूपये आणि 15 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवासासाठी 25 रूपये आकारण्यात येणार आहेत. यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. बेस्टचे भाडे कमी केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. सध्या कसे ‘बेस्ट’ काम करायचे यावर आम्ही लक्ष देत आहोत. आज केवळ ‘बेस्ट’ ऑफ लक म्हणालयलाच या ठिकाणी आलो असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.