मुंबई : या आठवड्यापासून दिवाळी सणाला सुरुवात होणार असल्यामुळे मुंबईतील सर्व ठिकाणच्या लहानमोठ्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. फराळ, कपडे, तोरणं, रांगोळी, दिवे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. पादचारी, फेरीवाले यांच्यामुळे वाहतूक कोंडीतही भर पडते आहे.

दिवाळी आणि खरेदी यांचे एक नाते आहे. ऑनलाईन खरेदीचा सध्याचा काळ असला तरी प्रत्यक्षात बाजारपेठांमध्ये जाऊन खरेदी करण्याची सवय या काळातही कायम असल्याचे दिवाळीच्या निमित्ताने जिकडेतिकडे दिसून येत आहे. येत्या शुक्रवारी वसुबारस असून दिवाळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शनिवार रविवारी मुंबईत खरेदीचा प्रचंड उत्साह होता. आता पुढचे काही दिवस खरेदीसाठी सर्वत्र अशीच झुंबड उडणार आहे. सर्वत्र खरेदीसाठी ग्राहकांनी सर्वत्र मोठी गर्दी केलेली दिसते आहे.

ठिकाठिकाणच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदी करणाऱ्यांची गर्दी दिसतेच पण दादर, क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर, मालाड मार्केट, बोरिवली या ठिकाणच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये संध्याकाळी गर्दीचा उच्चांक गाठला जातो आहे. दिवाळीच्या तोंडावर अनेक ठिकाणी ग्राहकपेठा, दिवाळी बाजार भरवण्यात आल्यामुळे त्यातही उत्साही मंडळी खरेदीची संधी साधत आहेत. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दादरमध्ये शनिवारी आणि रविवारी प्रचंड गर्दी झाली होती.

मुंबईत प्रत्येक गल्ली आणि नाक्यावर सगळ्या वस्तू मिळत असल्या तरी पारंपरिक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या दादरला अक्षरश: जत्रेचे स्वरुप आले आहे. फेरीवाल्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली असून रस्त्यावर दुकान थाटून त्यात रांगोळीचे रंग, पणत्या, फराळ, बांगड्या, नकली दागिने, तोरणे, विजेची तोरणे, कंदिल, फटाके विकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रस्त्यांवर विक्रीसाठी लटकवून ठेवलेल्या कंदिलांमुळे रस्तेही सजलेले दिसू लागले आहेत. रस्त्यावर जशी खरेदीसाठी गर्दी आहे तितकीच गर्दी दुकानांमध्ये आहे.

खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीतही भर पडली आहे. प्रभादेवीचा पूल पाडल्यामुळे आधीच दादरमध्ये वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच आता दिवाळीच्या खरेदीमुळे ठिकठिकाणी रस्ते, गल्ल्यांमध्ये वाहने, दुचाकी यांच्याही रांगा लागल्या आहेत. प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास टॅक्सीचालकही तयार नाहीत असे चित्र शनिवार, रविवारपासून सर्वत्र अनुभवायला मिळत होते. यंदा बाजारपेठांमध्ये कंदिलांमध्ये पैठणीचे कंदिल, मराठी भाषेचा अभिमान सांगणारे कंदिल बघायला मिळत आहेत. तर रांगोळ्यांमध्ये वेळ वाचवणारे व सहज काढता येतील असे स्टेन्सिल, केवळ रंग भरण्याची सोय असलेल्या तयार रांगोळ्या, रांगोळी काढल्यासारखे दिसतील असे स्टीकर उपलब्ध आहेत. तर पणत्यांमध्ये यंदा मातीच्या पणत्यांबरोबरच चिनीमातीच्या पणत्याही मोठ्या प्रमाणावर आहेत.