मुंबई : एमएचटी सीईटी दिलेल्या ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या तीन दिवसांमध्ये फक्त २२ हजार विद्यार्थ्यांनीच अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी केली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) शनिवारपासून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून, विद्यार्थ्यांना ८ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे पुढील सात दिवसांमध्ये तब्बल चार लाख विद्यार्थ्यांची नोंदणी होणे अपेक्षित आहे.
सीईटी कक्षातर्फे अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी यंदा १९ ते २७ एप्रिल या कालावधीत विविध सत्रांमध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर अखेरच्या सत्रामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये काही प्रश्न चुकीचे होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी ५ मे रोजी अतिरिक्त प्रवेश परीक्षा घेण्यात आली.
एमएचटी सीईटीच्या भौतिकशास्त्र, रसानयशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल १६ जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर सीईटी कक्षातर्फे २७ जून रोजी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार अर्ज नोंदणीला शनिवारपासून सुरुवात झाली असली तरी तीन दिवसांमध्ये अवघ्या २२ हजार विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज नोंदणी केल्याची माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली.
तर अद्याप चार लाख विद्यार्थांनी नोदणी करणे शिल्लक आहे. एमएचटी सीईटी परीक्षेत १०० पर्सेंटाईल गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहींनी जेईईमध्ये चांगले गुण मिळवल्याने त्यांनी आयआयटीसारख्या संस्थांमध्ये प्रवेशाला प्राधान्य दिले आहे.
नियमातील बदलामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब
अभियांत्रिकीसह अनेक तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे १६ जून रोजी निकाल लागूनही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास विलंब झाला. याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना ८ जुलैपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर १२ जुलै रोजी तात्पुरती यादी जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना १३ ते १५ जुलैदरम्यान या यादीवर हरकती, सूचना व तक्रारी नोंदवता येणार आहेत. त्यानंतर १७ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.