मुंबई : ॲन्टॉप हिल येथून बेपत्ता झालेल्या चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह कुलाबा येथील समुद्रात सापडला असून तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कौटुंबिक वादातून, तसेच मुलगी सारखी मोबाइल मागत असल्याच्या रागातून सावत्र पित्याने तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ससून डॉक येथून काही अंतरावर समुद्रात अमायरा शेखचा (४) मृतदेह सापडला होता. स्थानिक मच्छीमार गोपी धनु यांनी मृतदेह पाहिला आणि बोटीच्या साह्याने तो बाहेर काढून किनाऱ्यावर आणला. तसेच याबाबतची माहीती स्थानिक कुलाबा पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन सेट जॉर्ज रुग्णालयात नेला. तेथे मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली असून त्यानंतर तिचा मृतदेह समुद्रात फेकण्यात आल्याचे पोलिसांना समजले. याप्रकरणी सुरूवातीला कुलाबा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. मृत मुलगी ॲन्टॉप हिल परिसरातून बेपत्ता झाल्याचे पुढे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे सावत्र वडील इम्रान शेख याला ताब्यात घेतले. मुलीची आई नाझिया हिचा यापूर्वी घटस्फोट झाला असून तिने इम्रानसोबत लग्न केले होते. अमायराही आईसोबत इम्रानच्या घरी राहत होती. तसेच ती त्याला अब्बु म्हणायची. ते इम्रानला आवडायचे नाही. तसेच ती व्हिडिओ गेम खेळण्यासाठी इम्रानचा मोबाइल घ्यायची, रात्रभर व्हिडिओ गेम खेळत बसायची. त्याचा इम्रानला संताप आला होता. या रागातून आरोपीने दुचाकीवरून तिला दक्षिण मुंबईत नेले. तेथे गळा आवळून तिची हत्या केली व त्यानंतर मृतदेह पाण्यात फेकून दिला. याप्रकरणी आरोपी पित्याला ताब्यात घेतल्याची माहिती उपायुक्त (परिमंडळ-४) आर. रागसुधा यांनी दिली.
गंभीर बाब म्हणजे मुलीची हत्या केल्यानंतर इम्रान पुन्हा घरी आला. मुलगी बेपत्ता आहे, याची तक्रार देण्यासाठीही तो पत्नीसोबत पोलीस ठाण्यात गेला होता. पण मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर त्याने मोबाइल बंद केला व तो पळाला होता. इम्रान व नाझिया दोघांचाही घटस्फोट झाला असून नाझियाला चार मुले आहेत. त्यापैकी अमायरा एक होती. नाझिया खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायची. तर इम्रान बेरोजगार होता, त्यामुळे घरीच असायचा. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.