Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : मुंबई– मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनात हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उतरले असले तरी त्यात ग्रामीण भागातून आलेल्या कष्टकरी, श्रमिक, शेतमजूर आदींचाच सहभाग सर्वाधिक आहे. शहरी भागातील पांढरपेशी मराठ्यांनी मात्र गैरसोय होत असल्याने पाठ फिरवली आहे. श्रमिक रस्त्यावर, पांढऱपेशे समाजमाध्यमावर असे चित्र दिसून येत आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक आंदोलन असल्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातील मराठा समाजाचे आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.

कष्टकर्यांचा भरणा अधिक

या आंदोलनासाठी मुंबईत आलेले सर्वाधिक आंदोलक हे कष्टकरी, श्रमिक आणि शेतकरी आहेत. खाण्यापिण्याची आबाळ होते आहे. रात्र देखील फलाटावर काढावी लागली. अनेकांनी कोरडा शिधा आणला असून टेम्पोत स्वयंपाकासाठी साहित्य आणि गॅस आणला आहे. तेथेच स्वंयपाक करण्यात येत आहे. दुसरीकडे, पालिकेने पुरवलेल्या सोयी अपुऱ्या पडत आहेत. त्यात पावसाचीही भर आहे. परंतु आरक्षण मिळाल्याशिवाय हटायचे नाही, असा त्यांचा निर्धार कायम आहे. चार्जिंगची सोय नसल्याने अनेकांचे मोबाईल बंद पडले आहेत.

शहरी नागरिकांची पाठ

प्रस्थापित पांढरपेशा मराठा नागरिकांनी मात्र या आंदोलनात जाणे टाळले. मुंबईत प्रचंड गर्दी होत आहे. आम्ही आलो नसलो तरी आमचा सक्रीय पाठिंबा आहे, असे उपनगरात राहणाऱ्या एका मराठा समाजातील नागरिकाने सांगितले. आम्ही आंदोलनासाठी पैसे दिले आहेत, असे एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही आलो असतो पण आमच्या घरात गणपती आहे, असे कारण काहीजणांनी दिले. मुंबईत प्रस्थापित मराठा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ते शासकीय, खासगी क्षेत्रात उच्चपदावर आहेत. परंतु त्यांनी देखील गैरसोयीचे कारण देत टाळले आहे. याबाबत आंदोलनात आलेल्या मराठा आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हा लढा कुण्या एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण मराठा समाजाचा आहे. त्यामुळे किमान मुंबईतील शहरी लोकांनी यायला हवे होते अशी प्रतिक्रिया विदर्भातून आलेल्या एका आंदोलकाने व्यक्त केली. मराठा क्रांती मोर्च्यात प्रस्थापित दिसले होते. या रस्त्यावरील आंदोलनात मात्र त्यांनी पाठ फिरवली आहे.