Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानावरील मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांची झोपण्याची, खाण्यापिण्याची, शौचालयाची योग्य ती सोय होत नसल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी मुंबईत झालेल्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखलच चिखल झाला होता. आज सकाळीही पावसाची रिपरिप सुरु होती. त्यामुळे आंदोलकांचा दुसरा दिवसही चिखलातही जाणार आहे.

आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणावर आजही चिखल असल्याने आंदोलकांना मैदानावर बसता येत नाही. त्यामुळे आंदोलक पालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर, सीएसएमटी स्थानकासमोर किंवा मिळेल तिथे आसरा घेत आहेत. काही आंदोलक मात्र चिखलातच बसून असल्याचेही चित्र आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आझाद मैदानावर धडकले आहेत. शुक्रवारी दुपारी मोठ्या संख्येने आंदोलक मनोज जरांगेच्या व्यासपीठासमोर बसून होते. मात्र पावसाचा जोर वाढला आणि त्यानंतर मैदानात चिखल झाला. त्यामुळे आंदोलकांनी पालिका मुख्यालय परिसर, मुख्यालयासमोरचा रस्ता आणि सीएसएमटी स्थानकाचा आसरा घेतला आहे. काही आंदोलक आझाद मैदानाबाहेरील रस्त्यावर उभे आहेत. चिखलातून आंदोलक ये-जा करत आहेत.

आम्ही रात्री वाशीला मुक्कामी होतो, सकाळी १० वाजता आम्ही वाशीवरुन आझाद मैदानावर पोहचलो आहोत. आझाद मैदानावर आल्यास आम्हाला सगळीकडे चिखलच चिखल दिसत आहे. त्यामुळे आमची मोठी गैरसोय होत आहे. बसायला जागा नाही. काही आमचे बांधव चिखलातच बसून आहेत, तर मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर मिळेल तिथे उभे असल्याची माहिती आंदोलक उद्धव आरसूळ यांनी दिली.

मैदानावर येण्या-जाण्याच्या रस्त्यावर दोन टन खडी

आझाद मैदानावरील आंदोलकांना आझाद मैदानावर येणे-जाणे सोपे व्हावे यासाठी आझाद मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खडी टाकण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. तर जेथे खड्डे दिसत आहेत. तेथे खडी टाकण्यात आली आहे. आतापर्यंत दोन टन खडी रस्त्यावर टाकण्यात आल्याचेही पालिकेने सांगितले आहे. त्याचवेळी आंदोलकांच्या सोयीसाठी चार वैद्यकिय पथके, दोन रूग्णवाहिका, ११ पाण्याचे टँकर, २३६ शौचकुपी असलेली फिरती शौचालय अशा सुविधा पुरविण्यात आल्याचेही पालिकेने सांगितले. तसेच १०० कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात असल्याचे सांगितले.