गणेशोत्सवानंतरचे १५ दिवस महत्त्वाचे असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या काळात करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे टप्प्याटप्प्याने राज्यात अनलॉकची देखील प्रक्रिया सुरू असताना मुंबईत जलतरण तलाव खुले करण्याची मागणी करण्यात येत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरातील जलतरण तलाव खेळाडूंना सरावासाठी खुला करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांनी मनसेतर्फे यासंदर्भातलं निवेदन महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन त्यांना दिलं. त्यानंतर महापौरांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच, संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबईकरांना काळजी घेण्याचं देखील आवाहन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

“पुढच्या महिन्यात मोठी स्पर्था आहे. त्यांचं निवेदन संदीप देशपांडे, संतोष धुरींनी मला दिलं आहे. त्याबाबत आमच्या एएमसी अश्विनी भिडेंसोबत मी बोलले आहे. मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांपूर्वी सांगितलं होतं की गणपतीची परिस्थिती आलीये, त्यात लक्ष घालायचं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी आम्ही यासंदर्भात बोलू. खेळाडूंच्या निवेदनासंदर्भात आम्ही विचारणा करू. त्यांच्याकडून निर्णय झाला की नंतर महानगरपालिकेकडून आम्ही बाकीच्या गोष्टी तयार करू”, असं किशोरी पेडणेकर यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

“मुंबईदेखील बंद होऊ नये, यासाठी…”

“ओनम झाल्यानंतर केरळ बंद झालं, कोलकात्याला देवीचा उत्सव झाल्यानंतर कोलकाता बंद झालं. तशी मुंबई बंद होऊ नये, यासाठी आपण पावलं उचलत आहोत. तपासणी वाढवली आहे. बरेच लोक चेकिंगला घाबरतायत. बाहेरून आलोय, कोविड निघाला तर १४ दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल. पण लोकांनी घाबरू नये. तुमचे दोन्ही डोस झाले असतील, तर घाबरू नका. फक्त मास्क घाला. सर्दी, खोकला, ताप असेल तर तपासून घ्या. दुर्दैवाने कोविड निघाला, तर आपल्याकडे व्यवस्थित सोय आहे. कोविड आता हळूहळू बरा देखील होत आहे. तुम्ही घाबरून घरात थांबलात आणि कोविड वाढला तर वाचवणं कठीण जातं”, असं महापौर म्हणाल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai mayor warns of shutdown replying mns letter for swimming pool pmw
First published on: 21-09-2021 at 11:17 IST