मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेवरील वेळापत्रकात रविवारपासून आठवडाभरासाठी बदल करण्यात आला आहे. या मार्गिकेवरील सेवा १२ ते १८ ऑक्टोबर या काळात सकाळच्या वेळी काही मिनिटे उशिरा सुरू होणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जाहीर केले आहे.

एमएमआरडीएने सध्या ‘दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९’ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव टप्प्याच्या एकत्रिकरणासह सुरक्षा चाचण्यांचे काम हाती घेतला आहे. या कामासाठी एमएमआरडीएने ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांची सेवा सकाळी काही मिनिटांनी उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘मेट्रो ७’चा विस्तार ‘मेट्रो ९’ मार्गिकेच्या माध्यमातून केला जात आहे. सध्या मेट्रो ९ मार्गिकेचे काम वेगात सुरू असून या मार्गिकेतील दहिसर – काशीगाव दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. या टप्प्याची चाचणी सध्या सुरू आहे. या चाचणीसाठी आणि ‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो ९’ मार्गिकांचे एकत्रिकरण करण्याचे काम आता एमएमआरडीएने हाती घेतले आहे. या कामासाठी लागणारा वेळ लक्षात घेता एमएमआरडीएने ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

हा बदल तात्पुरता असून १२ ते १८ ऑक्टोबरपर्यंतच असणार आहे. या आठवड्याभरात गुंदवली – काशीगावदरम्यान अर्थात ‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो ९’ मार्गिकांवर चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळेच दररोज सकाळी ५.२५ वाजता सुरू होणारी ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील सेवा १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

१२ ते १८ ऑक्टोबरदरम्यानचे वेळापत्रक

डहाणूकरवाडीहून गुंदवलीला जाणारी पहिली मेट्रो सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी ७.०१ वाजता सुटेल. तर शनिवार सकाळी ७ वाजता आणि रविवारी सकाळी ७.०४ मिनिटांनी पहिली मेट्रो धावेल. डहाणुकरवाडीहून अंधेरी पश्चिमकडे सोमवार ते शुक्रवारदरम्यान पहिली गाडी सकाळी ७.०६ वाजता सुटणार आहे. तर शनिवारी सकाळी ६.५८ आणि रविवारी सकाळी ६.५९ वाजता सुटणार आहे.

दहिसर पूर्व येथून अंधेरी पश्चिमकडे सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी ६.५८ मिनिटांनी पहिली मेट्रो धावेल. तर शनिवारी सकाळी ७.०२ वाजता आणि रविवार सकाळी ७.०२ वाजता पहिली गाडी सुटणार आहे. दहिसर पूर्व येथून गुंदवलीकडे सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी ६.५८ वाजता पहिली गाडी सुटणार आहे. तर शनिवारी सकाळी ७.०६ वाजता आणि रविवारी सकाळी ७.०१ वाजता पहिली गाडी सुटणार आहे.

अंधेरी पश्चिम येथून गुंदवलीकडे जाणारी पहिली गाडी सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी ७.०१ वाजता सुटेल. तर शनिवारी सकाळी ७.०२ वाजता आणि रविवारी सकाळी ७.०४ वाजता सुटेल. तर अंधेरी पश्चिमहून गुंदवलीकडे जाणारी पहिली मेट्रो गाडी सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी ७.०६ वाजता सुटणार आहे. तर शनिवारी सकाळी ७.०२ वाजता आणि रविवारी सकाळी ७ वाजता पहिली मेट्रो गाडी सुटणार आहे.