मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘कुलाबा- वांद्रे- सीप्झ- आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक- कफ परेड या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र त्याआधीच या मार्गिकेवर शुक्रवारी दुर्घटना घडली. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत तांत्रिक बिघाड झाला आणि गाडीतून धूर आणि जळल्याचा वास येऊ लागल्याने गाडी सांताक्रूझ मेट्रो स्थानकावर थांबवण्यात आली. या गाडीतील प्रवाशांना बाहेर काढून दुसऱ्या गाडीने पुढे पाठविण्यात आले. दरम्यान, ‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो २ अ’ या मार्गिकांवरही शुक्रवारी संध्याकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे काम करीत आहे. सध्या या मार्गिकेवरील आरे- आचार्य अत्रे चौक दरम्यानचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल आहे, तर आचार्य अत्रे चौक – कफ परेड या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र त्याआधीच मेट्रो ३वर दुर्घटना घडली. शुक्रवारी दुपारी आरेवरून आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या दिशेने निघालेल्या मेट्रो गाडीत अचानक तांत्रिक बिघाड झाला. गाडीच्या ब्रेकमध्ये बिघाड झाला.
त्यानंतर काहीसा धूर आणि जळल्याचा वास आल्याने गाडीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दुपारी २.४४ वाजता गाडी सांताक्रूझ मेट्रो स्थानकावर थांबवली. प्रवाशांना तात्काळ गाडीतून बाहेर काढून सुरक्षितस्थळी नेण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या गाडीने पुढे पाठवण्यात आले. तांत्रिक बिघाड झालेली गाडी बीकेसी लूपलाइनवर तांत्रिक तपासणीसाठी नेण्यात आली. मात्र यादरम्यान प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडाला. यामुळे मेट्रो ३ मार्गिकेवरील वाहतूकही काहीशी विस्कळीत झाली होती.
मेट्रो गाडीत ठिणग्या उडाल्याची, आगीसारखी दुर्घटना घडल्याची चर्चा सुरू होती. मात्र असे काहीही घडले नसून गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने ती सांताक्रूझ मेट्रो स्थानकावर थांबविण्यात आल्याचे ‘एमएमआरसी’च्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. गाडी तात्काळ थांबवून प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या घटनेमुळे भुयारी मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याविषयी ‘एमएमआरसी’कडे विचारणा केली असता कोणतीही दुर्घटना घडल्यास वा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याच्याशी सामना करण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो २ अ’ची सेवाही विस्कळीत
‘मेट्रो २ अ’ (दहिसर – अंधेरी पश्चिम) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर – गुंदवली) या मार्गिकांवरही शुक्रवारी संध्याकाळी तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाली. दिंडोशी मेट्रो स्थानकावर उभ्या असलेल्या गाडीत वीजपुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याने ही गाडी रद्द करून ती परत कारशेडला न्यावी लागली. यात वेळ गेल्याने या मार्गिकांवरील वाहतूक विस्कळीत झाली. एमएमआरडीएने तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक सेवेवर काहीसा परिणाम झाल्याचे सांगितले, प्रवाशांनी मात्र समाजमाध्यमांवर ताशेरे ओढत मेट्रो सेवेवर टीका केली. काही वेळ नव्हे तर तासाभराहून अधिक काळ मेट्रो सेवा विस्कळीत होती. मेट्रो गाड्या २०-२० मिनिटे विलंबाने धावत होत्या. बऱ्याच वेळानंतर मेट्रोची वाहतूक सुरळीत झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.