मुंबई : मुंबई आणि बदलापूरला जोडणाऱ्या ‘कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो १४’ मार्गिकेच्या कामाला येत्या काही महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मेट्रो १४’ मार्गिकेच्या बांधकामासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या आठ ते दहा दिवसात स्वारस्य निविदा काढण्यात येणार आहेत.
कांजूरमार्ग – बदलापूर ही मार्गिका ३९ किमी लांबीची असून यात १५ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. कांजूरमार्ग – घणसोलीदरम्यान ही मार्गिका भुयारी असणार आहे. तर घणसोली – बदलापूरदम्यान ही मार्गिका उन्नत असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ३९ किमी लांबीच्या मार्गिकेपैकी ४.३८ किमीची मार्गिका पारसिक हिल भागातून जाणार आहे. तर ५.७ किमी लांबीची मार्गिका ठाणे खाडी परिसरातून जाणार आहे. मुंबईला थेट बदलापूरशी जोडणाऱ्या या ‘मेट्रो १४’ मार्गिकेसाठी १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील एक-एक मार्गिका मार्गी लागत असताना ‘मेट्रो १४’ मार्गिका केव्हा मार्गी लागणार असा प्रश्न होता. काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएने पर्यावरणीय प्रभाव अहवाल तयार करण्यासह वन आणि पर्यावरणासंबंधीची मंजुरी घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून ही मार्गिका मार्गी लावण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल उचलले. आता ‘मेट्रो १४’ मार्गिकेच्या कामासाठी स्वारस्य निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत या मार्गिकेच्या बांधकामासाठी स्वारस्य निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली.
स्वारस्य निविदेत सहभागी झालेल्या कंपन्यांकडून प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा मागविण्यात येतील. त्यानंतर निविदा अंतिम करून कंत्राट देऊन या मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. एकूणच एमएमआरडीएच्या या निर्णयामुळे ‘मेट्रो १४’ लवकरच मार्गी लागणार आहे. त्यामुळे ही बाब बदलापूरवासियांसाठी दिलासादायक असणार आहे.
सार्वजनिक-खासगी सहभागातून मार्गिकेची उभारणी
एमएमआरडीएने ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेची उभारणी सार्वजनिक-खासगी सहभागातून रिलायन्स इन्फ्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या मार्गिका विकायला काढण्याची वेळ मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड ( एमएमओपीएल) अर्थात रिलायन्स इन्फ्रावर आली आहे. एमएमआरडीएकडून ही मार्गिका अधिग्रहीत घेण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र मेट्रो १ ची यंत्रणा जुनी आहे. नियमांचे उल्लंघन झाले असून लेखा परीक्षणातही त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तसेच एमएमआरडीएला ६५० कोटींचे नुकसान होणार असल्याने ही मार्गिका अधिग्रहीत करण्याचा निर्णय एमएमआरडीएने रद्द केला आहे. एकूणच सार्वजनिक – खासगी सहभागातून मेट्रो मार्गिका मार्गी लावण्याचा प्रयोग बाद ठरला असताना आता ‘मेट्रो १४’ मार्गिका सार्वजनिक-खासगी सहभागातून मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ – नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८’ मार्गिकाही सार्वजनिक – खासगी सहभागातून उभारण्यात येणार आहे.