मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतेच एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केले असूनगिरणी कामगारांसाठी २०१६ मध्ये काढण्यात आलेल्या घरांच्या सोडतीतील कोन, पनवेलमधील विजेत्यांनी अद्याप घरांचा ताबा घेतलेला नाही. अशा विजेत्यांना अर्ज करण्यासाठी, कागदपत्रे सादर करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे. ७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या ३० दिवसांच्या कालावधीत १३०९ विजेत्या कामगार, वारसांनी म्हाडा कार्यालयात प्रत्यक्ष येऊन अर्ज सादर करावा वा मुंबई मंडळाच्या ई-मेलवर अर्ज पाठवण्याचे आवाहन मंडळाने निवेदनात केले आहे. या कालावधीत अर्ज न करणाऱ्या विजेत्यांचे घर रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना सधी दिली जाणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे १३०९ विजेत्यांनी यादी तपासून तात्काळ अर्ज करणे गरजेचे आहे.
कोनमधील एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील २४१७ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील विजेत्यांची पात्रता निश्चिती करून त्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया मागील काही वर्षांपासून सुरू असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. असे असताना १३०९ विजेत्यांनी अद्याप घरांचा ताबाच घेतलेला नाही. या विजेत्यांना वारंवार आवाहन करूनही त्यांनी ताब्याची प्रक्रियाच सुरू केलेली नाही. त्यामुळे आता या विजेत्यांना एक शेवटची संधी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार नुकतेच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर १३०९ विजेत्यांच्या यादीसह एक जाहीर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या निवेदनानुसार ७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान या विजेत्यांना कार्यालयीन वेळेत कागदपत्रांसह उपमुख्य अधिकारी /गिरणी, मुंबई मंडळ, कक्ष क्रमांक २०४, पहिला मजला येथे प्रत्यक्ष निवेदन, अर्जासह संपर्क साधता येणार आहे. ज्यांना प्रत्यक्ष संपर्क साधता येणार नाही त्यांना panvelkondoc.mhada@gmail.com या ई-मेल आयडीवर अर्ज जमा करता येणार आहे. म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर १३०९ विजेत्या कामगार, वारसांची यादी मंडळाने प्रसिद्ध केली आहे. ही यादी तपासून संबंधित विजेत्यांनी तातडीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ३० दिवसांच्या कालावधीत अर्ज सादर करून घराचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास संबंधित विजेत्यांला घरात स्वारस्य नाही असे समजले जाणार आहे. त्यानंतर घर रद्द करून त्याऐवजी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
म्हाडाच्या संकेतस्थळावरील यादी तपासून विजेत्यांनी तातडीने अर्ज करावा, असे आवाहन गिरणी कामगार संघटनांनीही विजेत्यांना केले आहे. ३० दिवसांच्या आत अर्ज करणार नाहीत त्यांना पुढील सोडतीत संधी देणार की नाही हे स्पष्ट नाही. त्यामुळे मंडळाने हे स्पष्ट करावे. तसेच गिरणी कामगारांसाठी राज्य सरकारने लवचिक धोरण ठेवले आहे. त्यामुळे अशा विजेत्यांना भविष्यातील सोडतीत घर मिळण्याचा अधिकार आहे, असे मत गिरणी कामगार संघर्ष समितीचे सचिव प्रवीण येरुणकर यांनी व्यक्त केले. कोनमधील घरांचे देखभाल शुल्क भरमसाठ असून ही घरे मुंबईपासून दूर आहेत. त्यामुळे अनेक विजेत्यांनी ही घरे नाकारली आहेत. कोनमधील घरे रद्द केली तरी त्यांना पुढील सोडतीत संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यातील सोडतीत त्यांना संधी द्यावी अशी मागणी सरकारकडे करण्यात येईल, असेही येरूणकर यांनी सांगितले.