मुंबई : राज्यातील शहरांमध्ये विद्यार्थ्यांना कमीतकमी भाड्यात निवास उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाने गृहनिर्माण धोरणात अशी घरे बांधणाऱ्या विकासकांना सवलती देऊ केल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध करुन देणाऱ्या विकासकांना चटईक्षेत्रफळापोटी रेडी रेकनरच्या फक्त १५ टक्के अधिमूल्य आकारले जाणार आहे.
राज्यात स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या या १६ लाख असून देशातील विविध राज्यात स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. मात्र या सर्व विद्यार्थ्यांना निवासाची सोय उपलब्ध नाही. यापैकी फक्त ४८ टक्के विद्यार्थ्यांना निवास उपलब्ध होतो. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांसाठी गृहनिर्माण ही संकल्पना पहिल्यांदाच राबविण्याचे ठरविले आहे. मुंबईत ताडदेव येथे म्हाडाच्या मालकीच्या स्वतंत्र इमारतीत शहरातील विद्यार्थ्यांना आधुनिक, सुरक्षित व स्वयंपूर्ण निवास भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन देण्याचे ठरविले आहे.
अनेक विद्यार्थी भाडे देण्यास तयार आहेत. परंतु त्यांना आवश्यक ती घरे उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी खासगी विकासकांनी विद्यार्थ्यांना घरे उपलब्ध करुन दिली तर त्यांना निवासी, कार्यालये तसेच वाणिज्यिक जागांच्या तुलनेत भाड्याच्या रुपाने मोठे उत्पन्न मिळू शकते. याशिवाय या विकासकांना सवलती देऊन अशी घरे उभारण्यासाठी नव्या गृहनिर्माण धोरणात प्रोत्साहित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी विकसित करण्यात आलेली मालमत्ता ही फक्त भाडेकरारावरच वितरीत करता येणार आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनाही करण्यात आली असून त्यानुसार अशी घरे निर्माण करणाऱ्या विकासकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना सोयीची ठरेल अशीच जागा निवडायची आहे. अभ्यासिका, व्यायामशाळा, मनोरंजन कक्ष आदी सुविधांसोबत स्वयंपाक घर आणि भोजन कक्षाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. २४ तास सुरक्षा आणि सामाईक परिसरात सीसीटीव्ही, दिव्यांग सुलभ सुविधा, जवळच असलेल्या वैद्यकीय सुविधा केंद्राशी संलग्नता असणे आवश्यक आहे.
असे प्रकल्प राबविणाऱ्या विकासकांना संमिश्र वापरास परवानगी मिळणार आहे तसेच रेडी रेकनरच्या फक्त १५ टक्के दराने चटईक्षेत्रफळ अधिमूल्य भरावे लागणार आहे. याशिवाय विकास शुल्क हप्त्यामध्ये भरता येणार आहे. वस्तू व सेवा कर फक्त एक टक्का तर नोंदणी व मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. याशिवाय प्रचालकालाही सवलती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या दहा वर्षांसाठी कमी मालमत्ता कर, रहिवासी दराने पाणी व वीजपुरवठा, चांगल्या विद्यार्थी निवासासाठी पारितोषिक, विद्यार्थी नोंदणी व उपलब्ध विद्यार्थी निवास यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली जाणार आहे.
कोणाला परवानगी?
खासगी विकासक स्वत:च्या भूखंडावर विद्यार्थ्यांसाठी गृहनिर्माण करुन स्वत: वा प्रचालकाला दीर्घकाळ भाडेतत्त्वावर देत असेल तर खासगी विकासकामार्फत शैक्षणिक संस्थेच्या भूखंडावर विद्यार्थ्यांसाठी गृहनिर्माण शैक्षणिक संस्थांच्या नजीक असेल्या व विक्री न झालेल्या निवासयोग्य सदनिकांचा वापर विद्यार्थ्यांच्या निवासासाठी करणे.