मुंबई – मालाडच्या एका मदरसातून पळून गेलेली ४ मुले राजस्थानच्या अजमेर येथे सापडली आहेत. मुले सुखरूप असून त्यांना आणण्यासाठी मालवणी पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना झाले आहे. मागील ५ दिवसांपासून या मुलांचा शोध सुरू होता.
मालाड पूर्वेच्या मालवणी येथे असलेल्या मदरसात देशभराच्या विविध भागातून आलेली मुले शिकतात. मंगळवार ८ जुलै रोजी तेथील ४ मुले बेपत्ता झाली होती. बाहेर गेलेली मुले संध्याकाळी साडेसात वाजता ती परतणे अपेक्षित होते. मात्र ती आली नाहीत. ती चारही मुले १२ ते १६ वर्ष वयोगटातील होती. मुले मागील दिड वर्षापासून त्या मदरसात शिक्षणासाठी आली होती. ती उत्तरप्रदेश राज्यातील होती. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ती न दिसल्याने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मालवणी पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन या मुलांच्या शोधासाठी विविध पथके स्थापन केली होती. पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानके, बस स्थानके, अन्य धार्मिक स्थळे आदी ठिकाणी शोध घेण्यास सुरवात केला होता. मदरसांमधील अन्य मुले, कर्मचारी,शिक्षक (मौलवी) यांचे जबाब नोंदविण्यात आले होते.
मुले अजमेर मध्ये सुखरूप
दरम्यान, राजस्थानच्या अजमेर येथील दर्गा परिसरात ही मुले फिरत असलेली स्थानिक पोलिसांना दिसली. त्यांनी या मुलांकडे चौकशी केल्यावर ती मुंबईतून आल्याचे समजले. त्यांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मुले सुखरूप असून ते स्वत:हून तिथे आल्याचे अजमेर पोलिसांनी सांगितले. मुले सापडल्याची माहिती मालवणी पोलिसांना देण्यात आली आहे. मालवणी पोलिसांचे एक पथक अजमेर येथे रवाना झाले आहे. मुले नेमकी का पळून गेली होती ते त्यांची चौकशी केल्यावरच समजेल असे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले.