मुंबई: रेल्वे परिसरातून चोरण्यात आलेले मोबाईल फोन परत मिळविण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सुरू केलेल्या मोबाईल शोध मोहिमेला (मिशन मोबाईल हंट) यश मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात पोलिसांच्या विशेष पथकाने ६४८ मोबाईल फोन परत मिळवले असून त्यांची किंमत १ कोटी ११ लाख एवढी आहे. मूळ मालकांना हे मोबाईल फोन परत करण्यात येत आहेत.
मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर उपनगरीय लोकल ट्रेन मधून दररोज लाखो प्रवासी दररोज प्रवास करत असतात. ट्रेनमधील वाढत्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहेत. महागडे मोबाईल फोन चोरीला जात असल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी हे चोरलेले फोन परत मिळविण्यासाठी मोबाईल शोध मोहीम (मिशन मोबाईल हंट) हाती घेतली होती. रेल्वेच्या विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या (एसीपी) मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याची ५ तसेच रेल्वे गुन्हे शाखेची ३ अशी एकूण ८ पथके स्थापन करण्यात आली होती. त्यात ३ पोलीस अधिकारी आणि ३९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जून महिन्यात ही मोहीम हाती घेण्यात आली होती. रेल्वे पोलीस आयुक्त या मोबाईल शोध मोहिमेचा दैनंदिन आढावा घेत होते.
१ कोटींचे ६४८ मोबाईल फोन हस्तगत
या पथकाने जून २०२५ ते जुलै २०५ या महिन्यात मुंबई आणि विविध परिसरातून चोरण्यात आलेेले ६४८ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्यात मुंबई रेल्वे परिसरातून चोरलेल्या ५५४ आणि आणि इतर राज्यातून हस्तगत करण्यात आलेल्या १३१ मोबाईल फोनचा समावेश आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोनची एकूण किंमत १ कोटी ११ लाख एवढी आहे. घाटकोपर येथील रेल्वे पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात झालेल्या एका छोटेखानी समारंभात ५० मोबाईल फोनच्या मालकांना हे मोबाईल परत करण्यात आले आहेत.
उर्वरित मोबाईल मालकांना हे फोन आठवड्याभरात परत केले जाणार आहेत. या प्रसंगी रेल्वेच्या पश्चिम परिमंडळाच्या पोलीस उपायुक्ता सुनिता साळुंखे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र रानमाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (वांद्रे) किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) आदी उपस्थित होते. चोरीचे मोबाईल परत मिळविण्याची कामगिरी बजाविणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कुख्यात टोळीच्या म्होरक्यास अटक
या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावताना रेल्वे गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाने भायखळा येथे सापळा लावून पोलिसांनी श्याम बर्नवाल (३६) याला अटक केली. त्याच्याकडून २० लाख रुपये किंमतीचे ४९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
दररोज होते ३० मोबाईल फोनची चोरी
२०२४ या वर्षात रेल्वेमधून ११ हजार १४३ मोबाईल फोन फोन चोरण्यात आले होते. म्हणजेच महिन्याला साधारण ९५० आणि दिवसाला सरासरी ३० मोबाईल फोनची चोरी होत आहे. चालू वर्षातील जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत ३ हजार ५७६ मोबाईल फोनची चोरी झाली आहे. म्हणजे या वर्षी देखील महिन्याला सातशेहून अधिक मोबाईल फोन चोरण्यात आले आहेत.