मुंबई : चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवर महिन्याभरात तीन वेळा तांत्रिक बिघाड होऊन मोनोरेल गाड्या बंद पडण्याच्या घटना घडल्या. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत मोनोरेल प्रकल्पावर टीका होऊ लागली आहे.

दरम्यान, आता मोनोरेल मार्गिका काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी जाहीर केला आहे. मोनोरेल मार्गिका केव्हापासून आणि किती काळासाठी बंद राहील यासंबंधीची माहिती अद्याप एमएमआरडीएकडून उपलब्ध झालेली नाही.

एमएमआरडीने चेंबूर – जेकब सर्कलदरम्यान २० किमी लांबीची मोनोरेल मार्गिका उभारली. २४६० कोटी रुपये खर्चाची ही मार्गिका तोट्यात आहे. या मार्गिकेला प्रवासी संख्याच मिळत नसल्याने हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरल्याचे चित्र आहे. एकीकडे प्रवासी संख्याच मिळत नसताना दुसरीकडे मोनोरेलमध्ये सातत्याने अपघात होत आहेत. काही ना काही कारणाने वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे मोनोरेल प्रकल्प वादात अडकला आहे.

एका गाडीच्या डब्याला २०१७ मध्ये आग लागली आणित गाडी जळून खाक झाली होती. त्यानंतर तब्बल ९ महिने मोनोरेल सेवा बंद होती. तर आता ऑगस्टमध्ये एकाच दिवशी दोन मोनोरेल गाड्या अतिवजनामुळे बंद पडल्या होत्या. यातील एका गाडीतील ५८८ प्रवाशांना मोनोरेल गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्याची वेळ अग्निशमन दलावर आली होती.

या घटनेनंतर मोनोरेलसाठी एमएमआरडीएकडे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नसून त्यांना अग्निशमन दलावरच अवलंबून रहावे लागत असल्याचे समोर आले. तर ऑगस्टची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी पुन्हा एक गाडी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. गाड्या सातत्याने बंद पडत असून दुर्घटना घडत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे नवीन मोनोरेल गाड्या सेवेत दाखल करण्यास विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर अखेर आता काही काळासाठी मोनोरेल मार्गिका बंद करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने जाहीर केले आहे.