मुंबई : चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिकेवरील सेवा शनिवार, १९ सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. मोनोरेल प्रकल्प अत्याधुनिक करण्यासाठी मोनोरेल सेवा बंद करण्यात आली आहे. आता सेवा बंद केल्यावर लगेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नवीन आठ मोनोरेल गाड्यांच्या चाचण्यांना शनिवारपासून अखेर सुरुवात केली आहे.
दुसरीकडे जुन्या पाच गाड्याही अत्याधुनिक करण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळात अत्याधुनिक मोनोरेल प्रकल्पाद्वारे सुरक्षित सेवा पुरवली जाईल, असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.
तोट्यातील मोनोरेल मार्गिका, गाड्यांची कमी संख्या, गाड्यांची दुरवस्था आणि सातत्याने होणारे अपघात, दुर्घटना यामुळे मोनोरेल प्रकल्पात वादात अडकला आहे. तर दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अखेर मोनोरेलची सेवा काही काळासाठी बंद करून मोनोरेल सुधारणा आराखड्याची अंमलबजावणी करून नवीन अत्याधुनिक मोनोरेल प्रणाली आणि अत्याधुनिक गाड्या सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शनिवारपासून सेवा अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे.
मोनोरेल सुधारणा आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सेवा पूर्णपणे बंद ठेवणे आवश्यक होते. त्यानुसार सेवा बंद करत तात्काळ नवीन आठ मोनोरेल गाड्यांच्या चाचण्या शनिवारपासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
मोनोरेल सुधारणा आराखड्यात नवीन देशी बनावटीच्या अत्याधुनिक, नवीन प्रणालीवर आधारित दहा मोनोरेल गाड्या सेवेत दाखल करण्याची तरतूद करण्यातआली होती. त्यानुसार ५९० कोटी रुपये खर्च करून नवीन दहा गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आठ गाड्या वडाळा कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत.
आठ नवीन गाड्या ताफ्यात येऊनही त्या गाड्या सेवेत का दाखल केल्या जात नाहीत असा प्रश्न होता. तेव्हा या गाड्यांसाठी आवश्यक नवीन प्रणाली मोनोरेल प्रकल्पात नसल्याने नवीन गाड्या असूनही त्या सेवेत आणता येत नव्हत्या. पण आता मात्र आठ नवीन गाड्यांची चाचणी शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. या गाड्यांसाठीच्या नवीन प्रणालीच्या कामालाही सुरूवात करण्यात आली आहे. त्याचवेळी जुन्या पाच गाड्या अत्याधुनिक करण्यास सुरुवात झाली आहे. जुन्या गाड्यांमध्येही नवीन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्याही येत्या काळात चांगली सुविधा पुरवतील असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे. तेव्हा अत्याधुनिक मोनोरेल सेवा केव्हा सुरू होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.