मुंबई : व्यावसायिक आस्थापनांच्या इमारतींच्या तळमजल्यावरील किंवा तळघरातील वाहनतळांचा गैरवापर होत असल्यास त्यावर मुंबई महापालिका प्रशासन कारवाई करणार आहे. या इमारतींची अकस्मात पाहणी करून वाहनतळचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तसे निर्देश दिले आहेत.
मुंबईत वाहनांची संख्या वाढत असून वाहने उभी करण्यासाठी जागाच उरलेली नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कुठेही कशीही वाहने उभी केली जातात. अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे गाड्या अडकून पडतात. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने आता व्यावसायिक मार्गाच्या ठिकाणी असलेल्या आस्थापनांच्या तळमजल्यातील वाहनतळांचा वापर नक्की वाहने उभी करण्यासाठी केला जातो का हे तपासण्याचे ठरवले आहे. त्याकरीता अशा ठिकाणी आकस्मिक भेटी द्याव्या व वाहनतळांचा गैरवापर होत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे भूषण गगराणी यांनी गेल्या आठवड्यात पालिका अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, याबाबतची कारवाई पालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत केली जाणार आहे. विभाग कार्यालयातील पदनिर्देशित अधिकारी ही कारवाई करणार आहेत. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्यावसायिक मार्गांच्या (कमर्शियल स्ट्रीट) ठिकाणी असलेल्या आस्थापनांना तळमजल्यावर वाहनतळ परवाना दिलेला असतो. एखादे हॉटेल, मॉल अशा ठिकाणी तळघरात, तळमजल्यावर वाहनतळे असणे अपेक्षित आहे. या जागेचा वापर अशा आस्थापनांच्या ग्राहकांची वाहने उभी करण्यासाठी केला जाणे अपेक्षित आहे.
तसे न होता त्या जागेचा वापर अनेकदा गोदाम म्हणून केला जातो किंवा त्याचा अन्य कारणांसाठी वापर केला जातो. त्यामुळे या आस्थापनांच्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी असतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी वरील निर्देश दिले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अकस्मात भेटी देऊन तत्काळ आणि कठोर कारवाई करावी, असे निर्देश भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
विविध योजना, प्रकल्प आदींची तयारी व उपाययोजना, तसेच त्यातील अडचणी आदींबाबत महानगरपालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि वनस्पती उद्यान (भायखळा) येथे गेल्या आठवड्यात पार पडली. त्यावेळी भूषण गगराणी यांनी वरील निर्देश दिले.
मुंबईतील सुलभ वाहतुकीच्या मार्गक्रमणात अडथळा निर्माण करणारी बेवारस वाहने आणि भंगार / टाकाऊ साहित्य तत्काळ निष्कासित करावे, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.