मुंबई : मुंबईमधील दुकाने व आस्थापनांवर मराठी, देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक असूनही ते लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या दुकाने व आस्थापनांवर १ मे पासून मालमत्ता कराइतक्या रकमेचा दंड आकारण्याचा इशारा महानगरपालिका आयुक्तांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर गेल्या १५ दिवसांमध्ये ६२५ दुकाने व आस्थापनांनी मराठी, देवनागरी लिपितील नामफलक लावून नियमाची पूर्तता केल्याचे निदर्शनास आले आहे. न्यायालयीन व महानगरपालिका सुनावणी प्रकरणांमध्ये संबंधितांकडून सुमारे ५० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

गेल्या १५ दिवसांमध्ये तपासणी करण्यात आलेल्या १,२८१ पैकी १,२३३ आस्थापने व दुकानांवर मराठी, देवनागरी लिपीतील नामफलक योग्यरित्या लावण्यात आल्याचे आढळून आले. दरम्यान, ज्या आस्थापना व दुकानांनी मराठी नामफलक लावलेले नाहीत, अशी दुकाने व आस्थापनांची माहिती नागरिकांनी महानगरपालिकेला द्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबई महानगरातील दुकाने व आस्थापनांविषयक बाबी, अनुज्ञापन पद्धती आदी बाबींचा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ८ एप्रिल रोजी आढावा घेतला होता. दरम्यान, मराठी भाषेत नामफलक नसलेल्या दुकाने व आस्थापनांना १ मेपासून त्यांच्या मालमत्ता कराइतका दंड ठोठावण्याचे आदेश गगराणी यांनी दिले होते.

हेही वाचा…वधू-वर सूचक संकेतस्थळावर वीसहून अधिक महिलांची फसवणूक करणाऱ्याला अटक

त्यानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे. मागील १५ दिवसांत महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या पथकांनी मिळून सुमारे १,२८१ आस्थापनांना भेटी दिल्या. त्यापैकी, १,२३३ आस्थापनांनी अधिनियमातील तरतुदींनुसार नामफलक लावल्याचे आढळले. तर, ज्या ४८ दुकाने व आस्थापनांवर निकषानुसार किंवा योग्यरित्या फलक आढळले नाहीत, त्यांना निरीक्षण अहवाल देण्यात आले आहेत.

हेही वाचा…उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन आणि प्रचारफेऱ्यांचा धडाका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियम धुडकावणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

न्यायालयात आतापर्यंत एकूण ७४२ प्रकरणांची सुनावणी होवून न्यायालयाने एकूण ५७ लाख ०४ हजार ६०० रुपये दंड संबंधित दुकाने व आस्थापना व्यावसायिकांना ठोठावला आहे. त्याचप्रमाणे, महानगरपालिका प्रशासनाकडे सुनावणीसाठी आलेल्या प्रकरणांपैकी ४०३ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यातून एकूण ३८ लाख २८ हजार रुपये दंड संबंधित दुकाने व आस्थापना व्यावसायिकांना ठोठावण्यात आला आहे. तसेच, मागील १५ दिवसांत न्यायालयात ५६५ प्रकरणांवर सुनावणी होवून ४३ लाख १० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनाकडे ६० प्रकरणांमध्ये सुनावणी होवून ६ लाख ४२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिकेने तैनात केलेली पथके ठिकठिकाणी जावून दुकाने व आस्थापनांच्या नामफलकांची तपासणी करीत आहेत. मराठी नामफलक नसलेली दुकाने व आस्थापना निदर्शनास आल्यास नागरिकांच्या त्यांची माहिती महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांना द्यावी, जेणेकरून संबंधितांवर कार्यवाही करता येईल, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.