मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई करण्याची मोहीम मुंबई महापालिकेने हाती घेतली आहे. मंगळवारी रात्रीपासून या कारवाईला सुरूवात झाली. संध्याकाळी ७ ते १० या वेळेत पुढील काही दिवस संपूर्ण मुंबईत ही कारवाई होणार आहे.

रस्त्यावर, उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून ते विकणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्याची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यासाठी प्रत्येक परिमंडळासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. एका परिमंडळातील पथक दुसऱ्या परिमंडळात जाऊन कारवाई करणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्यामुळे विषबाधा झाल्याच्या घटना गेल्या महिन्यात दोन ठिकाणी घडल्या होत्या. गोरेगावमध्ये २६ एप्रिल रोजी शॉर्मा खाल्यामुळे १० जणांना विषबाधा झाली होती. तर मानखुर्द परिसरात ७ मे रोजी पिझ्झा बर्गर खाल्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पालिकेने मानखुर्द परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेने खाद्यपदार्थ विक्रेत्या फेरीवाल्यांच्या विरोधात धडक कारवाई हाती घेतली आहे. मंगळवारपासून पुढील आठ ते दहा दिवस ही कारवाई करण्यात येणार आहे. पालिकेचे उपायुक्त (विशेष) यांनी याबाबतचे निर्देश संबंधित पालिका यंत्रणेला दिले आहे.

हेही वाचा…मोसमी पावसाने पर्यटनस्थळे फुलली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कारवाईसाठी परिमंडळ निहाय सात पथके तयार करण्यात आली आहेत. या कारवाईत खाद्यपदार्थांच्या गाड्या, सामान, गॅस सिलिंडर असे सामान जप्त करण्यात येणार आहे. वडाळा परिसरात सीसीटीव्हीची यंत्रणा असलेल्या गोदामात जप्त केलेले सामान जमा केले जाणार आहे. त्यामुळे कोणी आपले सामान सोडवून नेण्यासाठी येणाऱ्यांवरही लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.