मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मुंबईमध्ये आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून अग्निशमन केंद्रांची संख्याही तोकडी पडताना दिसत आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने आणखी तीन अग्निशमन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असून २०२४-२५ या वर्षासाठी अग्निशमन दलासाठी अर्थसंकल्पात २३२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाची क्षमता व सुविधा अद्ययावत करण्यासाठी इतर नवीन प्रकल्पही सुरु करण्यात येणार आहेत.
आगीच्या घटना घडल्यास तात्काळ बचावकार्य मिळावे तसेच अपुऱ्या यंत्रणेअभावी बचावकार्यात कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी सन २०२४ – २५ वर्षात सांताक्रूझमधील जुहू तारा मार्ग, चेंबूर येथील माहुल मार्ग आणि टिळक नगर येथे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभागामार्फत या कामाला सुरुवात केली जाईल. दरम्यान, कांदिवलीमधील ठाकूर व्हिलेज व कांजूरमार्ग येथील एल. बी. एस मार्ग येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन अग्निशमन केंद्रे लवकरच नागरिकांच्या सेवेस सज्ज होतील. मुंबईत आजमितीला ३५ मोठी, तर १९ लहान अग्निशमन केंद्रे आहेत. नव्याने उभारण्यात येणाऱ्या अग्निशमन केंद्रांच्या बांधकामानंतर या केंद्रांवरील भार काहीसा हलका होईल. तसेच, या अग्निशमन केंद्राकरिता ३ अग्निशमन वाहने व ३ जम्बो टँकर खरेदी करण्याचा निर्णय अग्निशमन दलाने घेतला आहे. अग्निशमन दलाकडून पुढील वर्षात अग्निशमन, संनिरीक्षण व मूल्यांकनासाठी फायर ड्रोन खरेदी करण्यात येणार आहे. तसेच बॅटरी ऑपरेटेड स्मोक एजोस्तार आणि ब्लोवर्सचे ३५ नगही खरेदी करण्यात येतील. बुडणाऱ्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी ६ जीवरक्षक रोबोटिक बोय खरेदी करण्याचाही निर्धार पालिकेने केला आहे. वेगवेगळ्या तीव्रतेच्या आगी व इमारती कोसळण्याच्या प्रसंगातील संरक्षण सरावाकरिता अत्याधुनिक सिम्युलेशन प्रणाली उभारण्याचीही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.