मुंबई : मालमत्ता कर थकवणाऱ्या चार मोठ्या थकबाकीदारांच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. प्रथमच स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. पाच मालमत्तांना लिलावासाठी २१ दिवसांची नोटीस दिल्यानंतर त्यापैकी एका मालमत्ताधारकाने थकबाकीची रक्कम भरल्यामुळे आता उर्वरित चार मालमत्तांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने लिलाव प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी या चार मालमत्तांना अंतिम सात दिवसांची नोटीस दिली आहे.
वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारावर कठोर कारवाई करण्यास मुंबई महापालिका प्रशानसाने सुरुवात केली आहे. यापूर्वी अशा मालमत्ता कर थकवणाऱ्या विकासकांच्या गाड्या जप्त करून त्यांचा लिलाव करण्याची कारवाई करण्यात आली. मात्र आता मुंबई महापालिकेने थकबाकीदारांच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्याचीही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मालमत्ता थकबाकीदारांना मुंबई महापालिकेने मोठाच धक्का दिला आहे. या कारवाईमुळे मोठ्या थकबाकीदारांना आपोआप चाप बसेल अशी अपेक्षा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱ्या करनिर्धारण व संकलन विभागाने मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. वर्षानुवर्षे कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना नोटीसा पाठवल्यानंतरही त्याकडे काणाडोळा करणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. गेल्यावर्षी काही थकबाकीदारांच्या वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. मात्र आतापर्यंत मुंबई महापालिकेने कधीही स्थावर मालमत्तांचा लिलाव केला नव्हता. भूखंड, इमारती अशा स्थावर मालमत्तांचा लिलाव करताना अनेकदा न्यायालयीन वाद असले की त्याचा लिलाव करण्यात अडथळा येतो. परंतु, यावेळी मुंबई महापालिकेने २४ विभागांतील अशा बड्या थकबाकीदारांच्या स्थावर मालमत्तांचा शोध घेतला आहे. तसेच या मालमत्ताबाबत कोणतेही वाद नाहीत ना याची छाननी विधि विभागामार्फत करण्यात येत आहे.
ज्या स्थावर मालमत्ता कोणत्याही प्रकारच्या वादात नाहीत अशा पाच मालमत्तांचा लिलाव करण्याचे करनिर्धारण विभागाने ठरवले आहे. त्याकरीता या मालमत्ताधारकांना २१ दिवसांची नोटीस देण्यात आली होती. या नोटीसीनंतर एका मालमत्ताधारकांनी थकबाकी भरल्यानंतर उर्वरित चार मालमत्ताधारकांना आता पुढची सात दिवसांची नोटीस देण्यात आली आहे. अन्य मालमत्तांची छाननी सुरू असून जसजशी छाननी पूर्ण होईल तसतशी त्यांचीही लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली.
हे मोठे थकबाकीदार असून त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यापूर्वी त्यांना नियमानुसार २१ दिवसांची नोटीस देण्यात आली होती. तरीही ज्यांनी थकबाकीची रक्कम भरलेली नाही. त्यांना आता सात दिवसांची नोटीस देण्यात आली आहे. त्यांनी थकबाकीची रक्कम भरली नाही, तर प्रशासन लिलावाची प्रक्रिया सुरू करेल असा इशारा यातून दिलेला आहे.- विश्वास शंकरवार, उपायुक्त, करनिर्धारण व संकलक
या आहेत चार मालमत्ता
विभाग – मालमत्ता – क्षेत्रफळ – एकूण थकबाकी (दंडासहित)
कुर्ला – शांती सदन सहकारी सोसायटी भूखंड – २५७० चौरस मीटर – ३ कोटी २८ लाख
चेंबूर – म्हाडा…… सुभाष नगर येथील भूखंड – ३९७३ चौरस मीटर – २ कोटी ७० लाख
मुंबादेवी – मिनोचर माणेकशा गांधी घर आणि दुकान – १६४८ चौरस मीटर – २ कोटी २४ लाख
बोरिवली – राजानी हाऊस – ६२४ चौरस मीटर – ३१ लाख ८१ हजार