मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा एकदा उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्राची जांभेकर यांच्याकडे शिक्षण विभागाचा भार सोपवण्यात आला आहे. तर शिक्षण विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून त्यांना आता उपायुक्त (विशेष) ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपायुक्त (विशेष) पदी असलेले किरण दिघावकर यांना घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याकडे प्रथमच शिक्षण विभाग देण्यात आला आहे.

महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी सेवानिवृत्त होत असून तितक्याच संख्येने पदे रिक्त होत आहेत. त्या जागी उपायुक्तांच्या बदल्या केल्या जात आहेत. मात्र या बदल्यांमागच्या राजकारणाचीही चर्चा पालिका वर्तुळात होऊ लागली आहे. राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या प्राची जांभेकर यांच्याकडे सध्या नियोजन विभागाच्या संचालकपदाचा कार्यभार होता. त्यांना गेल्याच आठवड्यात उपायुक्तपदी बढती देण्यात आली आहे. बुधवारी त्यांच्याकडे नियोजन विभागासह शिक्षण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर शिक्षण विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांची गेल्या तीन वर्षात तिसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांना घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती डिसेंबर २०२३ त्यांची तडकाफडकी शिक्षण विभागात बदली करण्यात आली होती. आता दहा महिन्यातच त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यामुळे चंदा जाधव यांची वारंवार बदली करण्यात येत असल्याबद्दल पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. चंदा जाधव यांना आता उपायुक्त (विशेष) या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे पालिकेचा परवाना विभाग, अतिक्रमण निर्मूलन, फेरीवाला, जाहिरात हे विषय असतील.

हेही वाचा : Mumbai Rain News: पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपायुक्त (विशेष) पदी असलेले किरण दिघावकर यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभाग सोपवण्यात आला आहे. पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त या पदाच्या जबाबदारीसह ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. दिघावकर यांनी आपल्या कार्यकाळात फेरीवाला निवडणूक, जाहिरात धोरण असे विषय मार्गी लावले होते. जाहिरात धोरणाला विरोध वाढू लागला होता. त्यामुळे दिघावकर यांची बदली झाल्याची चर्चा आहे.