मुंबई : रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वाकोला येथील कलिना गावातील रस्त्याचे काम प्रलंबित होते. सहाय्यक अभियंता सचिन बंडगर अन्य दोन सहकारी अभियंता प्रितम माने आणि भूषण बधान यांच्यासह गुरूवारी वाकोला येथे या कामांची पाहणी करण्यासाठी गेले होते.
रस्त्याच्या पुनर्निमाणाचे काम कसे होईल त्याची ते पाहणी करीत होते. त्यावेळी एका व्यक्तीने कामात अडथळा निर्माण केला. त्याने शिविगाळ करत भर रस्त्यांत बंडगर यांना मारहाण केली. बंडगर यांच्या सहकाऱ्यांनी नियंत्रण कक्षात फोन करून मदत मागवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीसह ४ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरण कलम १३२ आणि ३(५) अन्वये वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पालिका अभियंत्यांना मारहाण करण्याचे प्रकार वाढत असल्याने अभियंत्यांच्या संघटनांनी निषेध केला आहे. दोषींवर कडक कारवाई केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा महापालिका म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनने शुक्रवारी दिला.
