मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला फॅशन स्ट्रीटचा कायापालट आता लवकरच होण्याची शक्यता आहे. तरुणाईमध्ये खरेदीसाठी खास प्रसिद्ध असलेले फॅशन स्ट्रीट लवकरच नव्या स्वरुपात दिसण्याची शक्यता आहे. या परिसराचा पुरातन वारसा जपत खरेदीदारांसाठी सोयी-सुविधा देता याव्यात याकरीता मुंबई महानगरपालिकेने या कामासाठी सल्लागारही नेमले आहेत. क्रॉस मैदान झाकले जाणार नाही अशा पद्धतीने येथील दुकानांची रचना करण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईत क्रॉस मैदानाला लागूनच असलेले फॅशन स्ट्रीट ही मुंबईची खास ओळख आहे. मुंबईत आता सर्वत्र विविध प्रकारच्या कपड्यांची खरेदी करता येत असली तरी फॅशन स्ट्रीटला खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईत नव्याने येणारे पर्यटकही खरेदीसाठी फॅशन स्ट्रीटला येत असतात. नवीन पिढीचे आधुनिक कपडे मिळण्याचे ठिकाण म्हणून फॅशन स्ट्रीटची ओळख बनली आहे. मात्र गेल्या काही वर्षात या फॅशन स्ट्रीटला बकाल स्वरुप आले आहे.

हेही वाचा : “…तेव्हा अजित पवारांनी मोदींसमोर मंचावरून उठून निघून जायला हवं होतं”; राऊतांची घणाघाती टीका, म्हणाले…

कशीही थाटलेली दुकाने, खरेदीदारांची गर्दी, अनधिकृत फेरीवाले यामुळे येथे चालणेही मुश्कील झाले आहे. फॅशनस्ट्रीटच्या मागच्या बाजूला असलेले क्रॉस मैदान दुकानदारांनी लावलेल्या कपड्यांमुळे झाकले गेले आहे. त्यामुळे फॅशन स्ट्रीटमधील दुकानांची सुनियोजित पद्धतीने मांडणी करण्यासाठी कायापालट करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने आता या कामासाठी सल्लागारांची नेमणूक केली आहे.

हेही वाचा : पश्चिम रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल; ब्लॉकच्या पहिल्या दिवशी २५६ लोकल फेऱ्या रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फॅशन स्ट्रीटवर सुमारे १०० अधिकृत दुकाने आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत दुकानांची संख्या दोनशेपेक्षाही जास्त झाली आहे. त्यांना आखून दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागेत त्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे फॅशन स्ट्रीटचा कायापालट करताना या दुकानांची योग्य पद्धतीने रचना करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना थोडा वेळ बसता येईल अशीही सोय करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसाधनगृहाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामासाठीचे सादरीकरण नुकतेच करण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असेही ते म्हणाले.