मुंबई : चर्चगेट स्थानकाबाहेरील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ या चार अंतर्गत रस्त्यांचेही कॉंक्रीटीकरण मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. या रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाला मरीन ड्राईव्ह येथील रहिवासी संघटनेने जानेवारीत विरोध केला होता. मात्र आता ऑक्टोबरमध्ये रस्त्यांची उर्वरित कामे सुरू करण्यात आली. त्यात चर्चगेट स्थानकाबाहेरील रस्त्यांच्या कामांनाही सुरूवात झाली आहे. मात्र या कामांमुळे परिसरात वाहतूक कोंडी होईल, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली.
मुंबई महापालिकेने मुंबईतील सर्व रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा महाप्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षांत महानिविदाही काढण्यात आल्या. या रस्त्यांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण आणि नागरिकांना गैरसोय होत असल्यामुळे रस्त्यांच्या कामांवरून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होऊ लागली होती. त्यातच सुस्थितीत असलेल्या अनेक ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करू नये, अशीही मागणी करण्यात येत होती. वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी रस्त्याचे कॉंक्रीटकरण करू नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर या रस्त्याचे कॉंक्रीटीकरणाचे काम पालिका प्रशासनाने रद्द केले.
त्या पाठोपाठ मरीन ड्राईव्ह येथील अंतर्गत रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणालाही चर्चगेट परिसरातील रहिवाशांनी विरोध केला होता. चर्चगेट स्थानकाच्या बाहेरली ए, बी, सी व डी या चार अंतर्गत रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी नियुक्त कंत्राटदाराला येथील रहिवासी संघटनेने विरोध केला. त्यामुळे हे काम थांबवण्यात आले. जून – सप्टेंबर हे चार महिने रस्त्यांची कामे पूर्णतः बंद होती. त्यामुळे हा विषय मागे पडला. आता मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाने ऑक्टोबरपासून रस्त्यांची कामे सुरू केली असून त्यात चर्चगेट येथील ए, बी, सी, डी मार्गांचे कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. बी आणि सी मार्गावर खोदकाम सुरू करण्यात आले असून सिडनहॅम महाविद्यालयाच्या आसपासचा रस्ता खोदण्यास सुरूवात झाली आहे.
या चार रस्त्यांचे खोदकाम सुरू केल्यामुळे या मार्गावरून नरिमन पॉईंटकडे जाणाऱ्या बसगाड्या आणि शेअर टॅक्सीला वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याचे मत मरीन ड्राईव्ह रहिवासी संघटनेचे अश्विन अगरवाल यांनी व्यक्त केले. आतापर्यंत या बसगाड्या आणि टॅक्सी विनासिग्नल जात होत्या. वळसा घेऊन जाणाऱ्या या वाहनांना आता सिग्नल लागणार आहे. त्यामुळे सिग्नलचा कालावधी वाढवावा लागेल. रस्त्यांचे काम करताना येथील रहिवाशांना त्रास होऊ नये याकरीता आम्ही काही मागण्याचे पत्र लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाला देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
