मुंबई : मुंबई महानगरपालिकेने दादरमध्ये फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र केली असून याविरोधात फेरीवाल्यांनी दंड थोपटून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पालिकेने सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांनी येत्या १५ जुलै रोजी शिवाजी पार्कपासून मंत्रालयापर्यंत मूक मोर्चा काढण्याचा, तसेच बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय फेरीवाल्यांनी घेतला आहे.

मुंबईमध्ये फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. विविध प्रयत्न केल्यानंतरही ही समस्या पूर्णपणे सोडविण्यात पालिकेला यश आलेले नाही. मात्र, दादर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर पालिकेची करडी नजर आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पालिकेने या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असून दररोज संबंधित भागात पालिकेचे कर्मचारी तैनात असतात. पालिकेच्या या कठोर कारवाईमुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय थंडावले असून त्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या कारवाईमुळे हजारो फेरीवाल्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी खंत संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनने व्यक्त केली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यामुळे मुलांचे शाळेचे शुल्क, तसेच कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी फेरीवाल्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी फेरीवाल्यांना कर्ज देतात, स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि दुसरीकडे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन व्यवसाय करू देत नसल्याने फेरीवाले संतप्त झाले आहेत. त्यामुळे येत्या १५ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्कपासून मंत्रालयापर्यंत मूक मोर्चा काढण्याचा निर्णय संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनने घेतला आहे. त्यापूर्वी १३ जुलैपासून एकही फेरीवाला दादरचे रस्ते, पदपथांवर व्यवसाय करणार नाही, अशी माहिती संघटनेने दिली. महापालिका, पोलीस रस्त्यावर बसू देत नाहीत. घरात खाण्या-पिण्याच्या वस्तू नसल्याने घरचे घरी बसू देत नाहीत, आम्ही आत्महत्या करायची का? असा थेट प्रश्न संघटनेने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, जोपर्यंत पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नये, तसेच सरकारने लवकरच सर्वांना परवाने द्यावेत, अशी मागणी फेरीवाला संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.