मुंबई : मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार केला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विभागनिहाय शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमण्यात येणार असून, प्रशासकीय विभागातील सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, कीटक नियंत्रण अधिकारी यांच्या समन्वयातून ही प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

विशेष प्रशिक्षण देणार

मुंबईत पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने विविध यंत्रणांच्या सक्रिय सहभागाने डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार प्रशासकीय विभागातील सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, कीटक नियंत्रण अधिकारी यांच्या समन्वयातून कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, खासगी दवाखाने व रुग्णालयातील डॉक्टर, तसेच बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा अधिकारी व कामगार यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासोबतच खासगी रुग्णालये, दवाखाने यांच्या सहभागातून रुग्णांचा शोध घेणे, आजाराचे निदान करण्यापासून संपूर्ण उपचार देऊन रुग्ण बरा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमणार

पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी विभागनिहाय शीघ्र प्रतिसाद कृती पथकही नेमण्यात येणार आहेत. ही पथके विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करणार आहेत. तसेच अतिजोखमीच्या ठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना शहरातील सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, तसेच या मोहिमेमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी केले.

आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध

डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, तसेच महानगरपालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालयांमध्ये तापाच्या रुग्णांसाठी आवश्यक निदान व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तापाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित उपचार व वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

समन्वयासाठी व्हॉट्सॲप ग्रुप

डास उत्पत्ती स्थानांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने विविध यंत्रणांसोबत उत्तम समन्वय आणि संवादासाठी व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करण्याचे निर्देश भूषण गगराणी यांनी डास निर्मूलन समितीच्या आढावा बैठकीत दिले. तसेच मुंबई महानगरपालिकेचा कीटकनाशक विभाग आणि विविध यंत्रणांच्या सहकार्याने मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यामध्ये संयुक्त पाहणी दौरा आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीस केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौदल, वायूदल, अभियांत्रिकी सेवा, बेस्ट, टपाल विभाग, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., भाभा अणुसंशोधन केंद्र, दुग्ध विभाग अशा शासकीय, निम-शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांबरोबरच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.