मुंबई : पावसाळ्यात रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदाही ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिली आहे. मुंबई महानगरपालिकेने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ मोबाईल ॲप आणि व्हॉट्स ॲप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. ‘पॉटहोल क्विकफिक्स’ मोबाइल ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे.
पावसाळा तोंडावर आला असून मुंबईकरांना रस्त्यांच्या कामांमुळे किंवा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने सर्व नियोजन केले आहे. खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. तर दुसरीकडे खड्ड्यांच्या तक्रारींसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही यंत्रणा उभारण्यात आली आहे. ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे मोबाइल ॲप वापरकर्तास्नेही असून या ॲपद्वारे नागरिकांना खड्ड्यांचे छायाचित्र, स्थान आणि माहिती अपलोड करून तक्रार नोंदवण्याची सोपी व जलद सुविधा प्राप्त झाली आहे. मोबाइल ॲपद्वारे करण्यात आलेली तक्रार संबंधित विभागाकडे थेट पोहोचते आणि खड्डे दुरुस्ती प्रक्रिया तातडीने सुरू होते. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते हे ॲप ९ जून २०२५ पासून सुरू करण्यात आले आहे. ॲपवर तक्रार यशस्वीपणे नोंदविण्याची प्रक्रिया केवळ ५ पेक्षा कमी क्लीकमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे ॲप ॲण्ड्रॅाईड आणि आय.ओ.एस. या दोन्ही प्रणालींवर उपलब्ध आहे.
रस्त्यांवर आढळणारे खड्डे आणि ओबडधोबड रस्ते यांच्या तक्रारींसाठी महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे ॲप विकसित केले आहे. यामध्ये नोंदवलेली तक्रार संबंधित विभाग कार्यालयाकडे स्वयंचलित पद्धतीने पोहोचते, त्यामुळे महानगरपालिकेच्या अभियंत्यांना तात्काळ कार्यवाही करता येते. या ॲपमध्ये स्थाननिहाय तक्रार नोंदणी, छायाचित्र व स्थान टॅगिंग, तक्रारीच्या स्थितीचा मागोवा, दुरुस्तीची अपेक्षित वेळ आणि काम पूर्ण झाल्यानंतर अभिप्राय देण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच खड्ड्यांच्या तक्रारींसाठी महानगरपालिकेने व्हॉट्स ॲप चॅटबॉट (क्रमांक: ८९९९२२८९९९) सेवा सुरू केली आहे. याद्वारे खड्ड्यांसंदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहेत. ‘Pothole’ किंवा ‘PT’ (इंग्रजीत), तसेच ‘खड्डा’ किंवा ‘ख’ (मराठीत) असे प्रमुख शब्द (Key Word) वापरून, नागरिक व्हॉट्स ॲप चॅटच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. नागरिकांना अधिक सहजपणे तक्रार नोंदवता यावी या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
४८ तासात खड्डा बुजवणार
खड्ड्यांसंदर्भात तक्रार आल्यानंतर ४८ तासात तक्रारीचे निवारण होणे आवश्यक आहे. जर ४८ तासात तक्रारीचे निवारण झाले नाही तर त्याबाबतचा संदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. जेणेकरून वरिष्ठ अधिकारी या विषयाची दखल घेऊ शकतील. तक्रारीचे निवारण झाल्यानंतर तक्रारदाराला त्याबाबतचा संदेश (मेसेज) पाठविला जाईल व झालेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदार समाधानी नसेल तर त्याला तक्रार पुन्हा करता येईल.
नागरिकांच्या सहभागातून रस्ते अधिक सुरक्षित करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. नागरिकांना महानगरपालिकेकडून चांगल्या दर्जाची सेवा मिळविण्याचा अधिकार आहे. त्यात काही त्रुटी आढळल्यास तक्रार नोंदविण्यासाठी महानगरपालिकेने ॲप आणि व्हॉट्स ॲप चॅटबॉट हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले.