मुंबई : दैनंदिन जीवनात सर्व सुविधा ऑनलाईन मिळत आहेत. आता मुंबई महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. निधन झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी आता ऑनलाईन पद्धतीने वेळेची नोंदणी (स्लॉट बुक) करता येणार आहे. स्मशानभूमी, तसेच दफनभूमीमधील उपलब्धताही पाहता येणार आहे. शनिवार, १९ जुलैपासून ही सेवा सुरू होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्मशानभूमीशी संबंधित सेवा देण्याकरीता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मुंबई महापालिकेने भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित ‘’स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली (ऍप्लिकेशन)’’ सेवा सुरू करण्याते ठरवले आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका संचालित स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे.
मुंबई महापालिकेतर्फे मुंबईकर नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्यत खाते आणि माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित ‘’स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली (ऍप्लिकेशन)’’ सेवा सुरू करण्या्त येणार आहे. अंत्यसंस्काराची नोंदणी केल्यानंतर, तयार होणाऱ्या नोंदणी क्रमांकामुळे, नोंदणीची खात्रीलायक माहिती नागरिकांना प्राप्त होणार आहे. नोंदणी केलेल्या वेळेमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी / दफनभूमीवर पोहोचणे शक्य न झाल्यास नोंदणी केलेला कालावधी हा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून इतरांसाठी प्रणालीमध्ये उपलब्ध केला जाईल. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना या प्रणालीच्या माध्यमातून वेळेचे नियोजन करणे सोपे होईल. तसेच स्मशानभूमीतील कार्यरत कर्मचाऱ्यांसमवेत समन्वय साधण्याकरिता ही प्रणाली उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या सुविधा मिळणार
निधन झालेल्या / मृत व्यक्तीच्या स्थानापासून ५ किलोमीटर परिसरांतील अथवा निवडीद्वारे संपूर्ण मुंबई महानगरांतील स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेळ नोंदणी (स्लॉट बुक) करणे.
स्मशानभूमी व्यवस्थापनाद्वारे स्मशानभूमी / दफनभूमीमधील उपलब्धता पाहणे.
नागरिकांच्या प्रथेनुसार स्मशानभूमी / दफनभूमी निवडीचा पर्याय.
अंत्यसंस्काराच्या नोंदणीची माहिती, त्यात बदल करणे किंवा रद्द झाल्यास माहिती लघुसंदेश अर्थात ‘एसएमएस’द्वारे प्राप्त होणे
इथे करा नोंदणी
स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली / ॲप्लिकेशन शनिवार, १९ जुलै २०२५ पासून मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in वर नागरिकांसाठी- ‘अर्ज करा’- या सदरात उपलब्ध होणार आहे.
मुंबईत एकूण २०१ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी महानगरपालिकेच्या ८८ तर, खासगी ११३ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी महापालिकेच्या ५२ हिंदू स्मशानभूमी, २५ मुस्लिम आणि ११ ख्रिश्चन स्मशानभूमी आहेत. ५२ हिंदू स्मशानभूमीपैकी १० स्मशानभूमी या संयुक्त आहेत. यामध्ये सर्व धर्मियांसाठी अंत्यविधी करण्याची सोय उपलब्ध आहे. सद्यस्थितीत १० स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी व १८ स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी बसवण्यात आल्या आहेत