मुंबई : विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अंतर्गत मुंबई महापालिकेला ४२६ घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली असून या घरांसाठी मुंबई महापालिका २० नोव्हेंबरला सोडत काढणार आहे. त्याकरीता १६ ऑक्टोबरपासून घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या दहा दिवसात या घरांसाठी सुमारे ७०५ मुंबईकरांनी अर्ज भरले आहेत. तर त्यापैकी केवळ ४८४ अर्जदारांनी शुल्क भरले आहेत. तर अनामत रक्कम भरून सगळी प्रक्रिया पूर्ण करणारे केवळ आठ जण आहेत.
विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अंतर्गत ४ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील प्रकल्प राबवणा-या विकासकांडून पालिकेला प्रिमियमच्या बदल्यात घरे द्यावी लागतात. अशी ८०० घरे पालिकेच्या ताब्यात आली आहेत. त्यातील ४२६ घरांची सोडत काढून विक्री करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. पालिकेकडुन पहिल्यांदाच म्हाडाच्या धर्तीवर २० नोव्हेंबला अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी सोडत काढली जाणार आहे. या घरांसाठी बुधवार, १६ ऑक्टोबरपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज भरण्यासाठी १४ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. मात्र गेल्या दहा दिवसात या घरांकरीता १४,८०४ मुंबईकरांनी नोंदणी केली आहे. तर त्यापैकी केवळ ७०५ लोकांनी अर्ज भरले आहेत. ४८४ मुंबईकरांनी शुल्क भरले असून केवळ आठ अर्जदारांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून ते लॉटरीसाठी पात्र ठरले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या या घरांची किंमत ५४ लाख २७ हजार ते १ कोटीवर असणार आहे. जोगेश्वरीला अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घराची किंमत ५४ लाख २७ हजार तर भायखळा येथील घराची किंमत १ कोटींवर आहे. अल्प उत्पन्न गटासाठी घराची किंमत कमीत कमी ७८ लाख ५० हजार आण जास्तीत जास्त ९७ लाख ८६ हजार असेल. काही ठिकाणी बाजारभावापेक्षाही जास्त किंमत असलेली ही घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे या घरांना प्रतिसाद कमी मिळणार असल्याची चर्चा आहे. अर्ज भरण्याची मुदत सुरु होऊन दहा बारा दिवस झाले तरी या सोडतीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र दिवाळीनंतर मुंबईकरांचा प्रतिसाद वाढेल असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
म्हाडाप्रमाणे प्रतीक्षा यादीही
ही संपूर्ण सोडत म्हाडाच्या घरांच्या सोडतीच्या धर्तीवर असेल. घरांची सोडत लागल्यानंतरही म्हाडाप्रमाणे पात्र अर्जदारांची प्रतिक्षा यादीही तयार केली जाणार असल्याचेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुठे किती घरे (अत्यल्प गटासाठी)
| ठिकाण | घरे | किंमत |
| एलबीआस मार्ग भांडुप (प) | २४० | ६३,५०,९८६ |
| वाढवण कांदिवली पूर्व | ३० | ६३,७७,१६२ |
| दहिसर | ०४ | ६६,४०,०९० |
| भायखळा | ४२ | १,०१,२५,१०९ |
| जोगेश्वरी पूर्व | ४६ | ५४२७४०४ |
| पिरामल नगर गोरेगाव | १९ | ५९१५६०२ |
अल्प उत्पन्न गटासाठी घरे
| ठिकाण | घरे | किंमत |
| कांदिवली | ४ | ८१,७९,२१७ |
| कांजूर | २७ | ९७,८६,३९२ |
| मरोळ, अंधेरी (पू) | १४ | ७८,५०,९१० |
